जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीस केंद्रीय ग्राम विकास समिती अध्यक्षा तथा खासदार प्रतापराव जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष मनिषा पवार, पंचायत राज समितीचे प्रमुख तथा आ. डॉ. संजय रायमुलकर, आ. राजेश ऐकडे, आ. संजय गायकवाड, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते प्रामुख्याने उपस्थित होत्या.
जलजीवन मिशनमध्ये घेण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा योजना ह्या जुन्याच असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, योजनांची नावे बदलण्यात येत असून मिशनमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे. या योजनांवर करोडो रुपये खर्च होतात. परंतु पाणीटंचाई कायम राहते. त्यामुळे ही कामे दर्जेदार करण्यात यावी. योजनेत घेण्यात आलेल्या गावांची पाणीटंचाई संपुष्टात यावी. पाणी पुरवठ्या संदर्भात अनेक तक्रारी आल्या असून पुढील बैठकीत सर्व तक्रारींचा सुस्पष्ट अहवाल तयार करून सादर करावा. जिल्ह्यातील एकही गाव पाणी पुरवठा योजनेतून सुटता कामा नये, अशा सूचनाही पालकमंत्री यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागात सुरू असलेल्या योजनांचा आढावा त्यांनी घेतला.