- अनिल गवई
खामगाव: तालुक्यातील निमकोहळा-काळेगाव येथील निम्न ज्ञानगंगा प्रकल्प-२ बृहत लघु पाटबंधारे योजनेतील सांडव्याचा पाणी प्रवाह नाल्यात सोडण्यासाठी शेतकरी अनुकूल झालेत. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या वादावर आता सकारात्मक तोडगा निघाला आहे. त्यामुळे प्रशासन आणि शेतकरी यांच्यात गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेला वादही निकाली निघाल्याचे संकेत आहेत.
निम्न ज्ञानगंगा-२ बृहत लघू पाटबंधारे योजनेकरीता निमकोहळा आणि काळेगाव येथील नाल्याच्या दोन्ही बाजूच्या भुसंपादन कामे आणि मोजणी पूर्ण झालेली आहे. यासंदर्भातील भुसंपादन प्रस्ताव जिल्हाधिकारी, बुलडाणा यांच्याकडे सादर करण्यात येईल. जिल्हाधिकारी स्तरावरून सरळ खरेदीचा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर मोबदला अदा करण्यासंदर्भातील लेखी आश्वासन निमकोहळा आणि काळेगाव येथील शेतकºयांना लघु पाटबंधारे बांधकाम उपविभाग, बुलडाणा यांनी दिले. परिणामी गेल्या चार महिन्यांपासून पाटबंधारे विभाग आणि शेतकरी यांच्या सुरू असलेला संघर्ष निकाली निघाला आहे. या बैठकीला शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष मोहनसिंह बॅनर्जी, नयनसिंह इंगळे, पृथ्वीराज इंगळे, मनोहर लोड, गजानन सुरडकार, आब्दुल बागवान, वासुदेव पाटील, योगेश इंगळे, शब्बीर बागवान, प्रतापसिंह इंगळे, शेषराव भोसले आदींची उपस्थिती होती.
पाणी सोडण्यावरून निर्माण झाला होता संघर्ष!
गेटद्वारे सांडव्यात सोडल्या जाणारे पाणी शेतकºयांच्या मालकीच्या नाल्यात सोडण्यास शेतकºयांचा विरोध होता. शेतकºयांना विश्वासात न घेता, दबावतंत्रांचा वापर करून पाटबंधारे विभागाने प्रकल्पाचे काम सुरू केले होते. शेतकºयांच्या विरोधात पिंपळगाव राजा पोलिसांमध्ये तक्रारही देण्यात आली. परिणामी शेतकरी आणि पाटबंधारे विभागामध्ये संघर्ष उद्भवला. या संघर्षामुळे शेतकºयांनी प्रकल्पाचे काम अनेकवेळा बंद पाडले.
कार्यकारी अभियंत्यांची मध्यस्थी!
शेतकरी आणि पाटबंधारे विभागातील टोकाला गेलेला संघर्ष निमकोहळा येथील ज्ञानगंगा खोरे संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा भाजपचे तालुका सरचिटणीस मोहनसींह बॅनर्जी यांच्या पुढाकारात पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सुनिल चौधरी यांच्या दालनात पोहोचला. याठिकाणी दोन्ही बाजूने सकारात्मक चर्चा झाली. यामध्ये कार्यकारी अभियंत्यांच्या निर्देशानुसार उपविभागीय अधिकाºयांनी शेतकºयांना लेखी दिले.
राज्याचे कृषी तथा फलोत्पादन मंत्री स्व. भाऊसाहेब फुंडकर यांचा ‘ड्रीम’प्रोजेक्ट म्हणूनच याप्रकल्पाची ओळख आहे. याप्रकल्पाच्या वाढीव निधीसाठी ना. फुंडकरांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच या प्रकल्पाला वेळोवेळी विशेष निधीही मिळाला. त्यामुळे याप्रकल्पाकडे आमदार आकाश फुंडकर यांचा विशेष पाठपुरावा आहे. हा प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी आमदार आकाश फुंडकर प्रयत्नरत आहेत.
-मोहनसिंह बॅनर्जी, अध्यक्ष,निम्न ज्ञानगंगा खोरे संघर्ष समिती, खामगाव.