बुलडाणा : जिल्ह्यात बऱ्याच रस्त्यांची कामे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहेत. त्यामधील काही रस्ते पूर्ण झाले आहेत, तर काहींचे काम सुरू आहेत. मात्र, काही रस्ता कामात भूसंपादन, वनजमिनीचे प्रश्न निर्माण झाले आहेत तरी संबंधित यंत्रणांनी या रस्ता कामांमधील भूसंपादनाचे व वनजमिनीचे प्रश्न मार्गी लावावे, अशा सूचना पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या.
रस्ता कामामधील भूसंपादन व वनजमिनीच्या प्रश्नासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला व्यासपीठावर पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया, उपवनसंरक्षक गजभिये, जिल्हा नियोजन अधिकारी सुनय लाड, प्र. अप्पर जिल्हाधिकारी दिनेश गीते, उपवनसरंक्षक (वन्यजीव) श्री. रेड्डी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ शिंगणे सूचना देताना म्हणाले, चिखली ते दे. राजा महामार्गावरील टाकरखेडजवळील भूसंपादनाचे काम तातडीने मार्गी लावून पुलाजवळील दोन्ही रस्ता पूर्ण करावा. चिखली ते खामगांव रस्त्यावरील पेठ गावाजवळील पैनगंगा नदीवरील पुलाचे कामही भूसंपादनामुळे थांबलेले आहे. याठिकाणीसुद्धा भूसंपादन करून जागा द्यावी. जेणेकरून पुलाचे काम मार्गी लागेल. बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.