लोकमत न्यूज नेटवर्कवरवट बकाल : जवळच असलेल्या सावळी येथील मराठी शाळेच्या इमारतीची भिंत कोसळली आहे. पुर्णानदी काठावर वसलेल्या सावळी गावाची लोकसंख्या ८०० आहे. येथे जि.प. मराठी शाळेची स्थापना १९५३ मध्ये झाली. शाळेची इमारत ६६ वर्षे जुनी झाली आहे. दोन खोल्याचे बांधकाम करण्यात आले असून एकूण ४ वर्ग आहेत. विद्यार्थी संख्या ५६ आहे. जीर्ण झालेल्या २ वर्ग खोल्यांमध्ये १ ते ४ पर्यंत विद्यार्थ्यांना बसविण्यात येते.इमारत शिकस्त झाल्याने विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षकांचाही जीव धोक्यात आला आहे. गत २ वर्षांपासून शालेय व्यवस्थापन समितीने शाळेच्या इमारतीचे बांधकाम करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविला आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करुनही दुर्लक्ष करण्यात आले. यावर्षी चांगला पाऊस सुरू आहे. आठवडभरात झालेल्या पावसाचे पाणी भिंतीत मुरल्याने शनिवारी रात्री शाळेची भिंत कोसळली. शाळा सुरू असताना भिंत कोसळली असती, तर दुर्घटना घडली असती. दरम्यान यामुळे सावळी येथील ग्रामस्थांमधून रोष व्यक्त करण्यात येत आहे. माजी सरपंचासह ग्रामस्थ आक्रमक झाले असून पंचायत समिती कार्यालयात शाळा भरविण्याचा निर्धार केला आहे. (वार्ताहर)
शाळेच्या शिकस्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2019 3:18 PM