- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्क खामगाव : रब्बी हंगामात पेरणीसाठी जिल्ह्याला प्रस्तावित क्षेत्रानुसार ९८,३४४ क्विंटल बियाण्यांची आवश्यकता असून, सध्या २० हजार ७८५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. सध्या रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळात बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू पिकासाठी ६६५०३ हेक्टरचे नियोजन करण्यात आले असून, त्याकरिता ४६५०० क्विंटल बियाणे लागणार आहे. जिल्ह्यात सध्या २६९९ क्विंटल बियाणेच उपलब्ध आहेत. तसेच हरभरा पिकासाठी ६१२४२ हेक्टर क्षेत नियोजित असून, ४९७२१ क्विंटल बियाणे लागणार आहे. सध्या १७१९६ क्विंटल बियाणेच उपलब्ध आहेत. मकासाठी १७४५० हेक्टर क्षेत्र नियोजित असून, १४४० क्चिंटल बियाणे लागणार आहे, तर सध्या ४५० क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. ज्वारीसाठी ११४४९ हेक्टरवर पेरणीकरिता ६७८ क्विंटल बियाणे लागणार असून, १९७ क्विंटल उपलब्ध आहेत. करडीची ३१३ हेक्टर, सूर्यफूल १७६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात येणार आहे. त्याकरिता ९८३४४ क्विंटल बियाण्यांची गरज भासणार आहे. सध्या जिल्ह्यात २०७८५ क्विंटल बियाणे उपलब्ध आहेत. सध्या रब्बीची पेरणी सुरू झाली आहे. यावर्षी परतीच्या पावसाने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी त्याचा रब्बी हंगामातील पिकांना फायदा होणार आहे. यावर्षी जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभऱ्याची पेरणी ३० ते ४० हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यांपैकी बुलडाणा, सिंदखेड राजा, चिखली, देऊळगाव राजा, मलकापूर, संग्रामपूर व नांदुरा या तालुक्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला. आगामी काळात मागणी वाढल्यानंतर बियाणे उपलब्ध करण्यात येईल, तसेच अनेक शेतकरी घरगुती बियाण्यांचाही वापर करणार असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक नाईक यांनी सांगितले.
आवश्यक बियाण्यांच्या ४० टक्केच मागणी असते. उर्वरित ६० टक्के बियाणे शेतकरी स्वत:जवळील वापरतात. सध्या ६० टक्के बियाणे पुरवठा आहे; मात्र त्यापैकी केवळ १५ टक्के विक्री आहे. प्रत्यक्ष हंगाम आता सुरू होत आहे.- नरेंद्र नाईक जिल्हा कृषी अधिकारी, बुलडाणा.