बुलडाणा: अवर्षण सदृश्य स्थितीत जिल्ह्यातील एक लाख ६५ हजार हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. दरम्यान, यामध्ये तब्बल एक लाख ९ हजार हेक्टरवर हरभर्याचा पेरा होण्याचा अंदाज जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, रब्बीच्या दृष्टीने ६५ हजार १७७ क्विंटल बियाण्यांची उपलब्धता बाजारात करण्यात आली असल्याचेही कृषी विभागाच्या सुत्रांनी सांगितले. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ३० टक्के पाऊस कमी झाला आहे. अवर्षण सदृश्य स्थिती जिल्ह्यात आहे. त्यामुळे नियोजन केलेल्या क्षेत्रापैकी प्रत्यक्षात किती क्षेत्रावर पेरा होईल याचा अंदाज बांधणे काहीे कठिण आहे. त्यातच जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा १७ टक्के पाणीसाठा असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्यावे लागणार आहे. त्यामुळे शेती सिंचनालाही फटका बसण्याची चिन्हे आहेत. परिणामी अपवादात्मक स्थितीत एखाद दुसरे आवर्तनच प्रकल्पातून पिकांसाठी देता येणे शक्य होईल, असा अंदाज आहे. बुलडाणा जिल्ह्याचे साडेसात लाख हेक्टर क्षेत्र पेरणी योग्य आहे. त्यापैकी रब्बीमध्ये साधारणत: दोन लाख हेक्टरवर साधारणत: जिल्ह्यात पेरणी होते. मात्र सध्याची अवर्षण सदृश्य स्थिती पाहता कृषी विभागाने एक लाख ६५ हजार हेक्टवरच पेरणीचे नियोजन केले आहे. यामध्ये रब्बी ज्वारीचे क्षेत्र १४ हजार ०७४, गहू ३२ हजार ४६, हरभरा एक लाख नऊ हजार , करडी १६० हेक्टर, सुर्य फूल १७५ आणि मका नऊ हजार ६०० हेक्टरवर पेरा करण्याचे नियोजन आहे.