सिंदखेडराजा : दहा दिवसांपूर्वी कोणीही जा आणि लस घेऊन या, अशी स्थिती होती; परंतु आता चित्र पालटले आहे. आरोग्य सेतू आणि कोविन या दोन संकेत स्थळांवरून आपले लसीकरण आरक्षित करावे लागत आहे. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांना, ग्रामीण लोकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पहिल्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यात आली. आता युवकांना देखील लस दिली जात आहे; परंतु रजिस्ट्रेशन आणि तारखेची निश्चिती करूनच लस घ्यावी लागत असल्याने याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वरील दोन्ही ॲपवर रजिस्ट्रेशन अगदी सहज होते; पण शेड्युल ऑप्शनवर गेल्यानंतर शेड्युल कन्फर्म होत नाही अशी अनेकांची तक्रार आहे. त्याहीपेक्षा या शेड्युल ऑप्शनवर अनेक लसीकरण केंद्र दिसत नाहीत़ त्यामुळे ऑप्शन निवडण्यात अडचणी येत आहेत. दोन्ही ॲपवरील या अडचणी सोडविल्यास लसीकरण अधिक गतीने करता येणार आहे; परंतु जिल्हा प्रशासनाचे याकडे लक्ष नसल्याने लसीकरण केंद्रांवर मोठी गर्दी सोबतच वाद वाढले आहेत. सिंदखेडराजा येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप मेहेत्रे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भातील निवेदन पाठविले असून, लसीकरण पूर्वीप्रमाणे केवळ रजिस्ट्रेशन करून करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. सोप्या पद्धतीने लसीकरण झाल्यास लसीकरण केंद्रावरील गर्दी कमी होण्यास मदत होईल. परिणामी कोरोना संसर्ग वाढणार नाही, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.