दरम्यान, हे प्रकरण नंतर थेट पोलीस ठाण्याच्या उंबरठ्यावरही पोहोचले होते. मात्र, उभय बाजूंनी सामंजस्याची भूमिका घेत संबंधितांकडून माफीनामा घेतल्यानंतर प्रकरण निवळल्याची चर्चा आहे. आता या प्रकरणावर बोलण्यास पालिकेतील कर्मचारी व नगरसेवक तयार नसल्याचे एकंदरीत चित्र आहे. हा ‘राडा’ सध्या चर्चेत आहे. नऊ फेब्रुवारी रोजी एक स्वीकृत नगरसेवक आणि अकाउंट विभागातील एका कर्मचाऱ्यामध्ये विकासकामाचे देयक काढण्याच्या कारणावरून वाद झाला. उभयतांमध्ये चांगलीच शाब्दिक बाचाबाची झाली व प्रकरण हातघाईवर आले. या प्रकरणाची चर्चा पालिका कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचल्यानंतर संबंधित नगरसेवकाच्या दबावाला न जुमानता पालिका कर्मचाऱ्यांनी कामकाजही बंद केले होते. पालिका कर्मचारी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठीही पोहोचले होते. त्याची माहिती अन्य नगरसेवकांना मिळाल्यानंतर तेही पोलीस ठाण्यात धावून गेले. त्यांनी संबंधित कर्मचारी व त्याच्या सहकाऱ्यांची समजूत घालून हे प्रकरण आपसात मिटवले. हे प्रकरण माफीनामा लिहून दिल्यानंतर शांत झाल्याची चर्चा सध्या शहरात आहे. यासंदर्भात पालिका कर्मचाऱ्यांशी संवाद साधून नेमका काय प्रकार घडला, याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता त्याबाबत बोलणेही टाळले जात होते. पोलीस प्रशासनास विचारणा केली असता, प्रकरण आपसात मिटल्याचे सांगण्यात आले. सोबतच पोलिसांत तक्रार झाली नसल्याचेही पोलीस सांगत आहेत.
विकासकामांच्या देयकावरून बुलडाणा पालिकेत राडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 4:35 AM