लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात १८ मे पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. दरम्यान, या आंदोलनाच्या समर्थनार्थ युवक काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी रास्ता रोको करण्यात येणार असून, प्रशासनाने या उपोषणाची दखल न घेतल्यास जिल्हा बंद करण्याचा इशारा देण्यात आला आहे.जिल्ह्यात शासकीय यंत्रणेद्वारे सुरू असलेली तूर खरेदी शासनाच्या धरसोड धोरण व शासकीय अधिकाऱ्यांच्या वेळकाढू व उदासीन धोरणामुळे रखडली असून, तूर उत्पादक शेतकऱ्यांची परीक्षा पाहणारी व प्रचंड त्रासदायक ठरली आहे़ संथ गतीने तुरीचे मोजमाप व बारदाण्याचा अभाव, मोजणीसाठी काट्याचा अभाव, अधिकाऱ्यांची बेपर्वा वृत्ती, खरेदीसाठी हेतुपुरस्सरपणे केली जाणारी दिरंगाई आणि खरेदी झालेल्या तुरीचे पैसे देण्यास होणारा अक्षम्य विलंब, यामुळे शेतकरी बेजार झालेले आहे़त ३१ मे पर्यंतची मुदतवाढ दिली असली, तरी आजवर २२ एप्रिलपर्यंत खरेदी केंद्रावर आणलेल्या तुरीचेही मोजमाप झालेले नाही. महिना उलटूनही १० एप्रिलपर्यंत खरेदी झालेल्या तुरीचे चुकारे शेतकऱ्यांना देण्यात आलेले नाहीत, अशी स्थिती आहे़ तरी चुकारे त्वरित मिळावेत आणि आलेला खरीप हंगाम पाहता खरेदी करावयाच्या तुरीचे आगाऊ चुकारे देण्यात यावेत, या मागणीसाठी १८ मे रोजी बुलडाणा येथील हुतात्मा स्मारकास पुष्प अर्पण करून बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात हजारो कार्यकर्ते व शेतकरी यांच्या उपस्थितीत बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. युवक काँग्रेसच्यावतीने १९ मे रोजी जिल्हाभर रास्ता रोको करण्याची घोषणा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज कायंदे यांनी केली आहे़ प्रशासनाने दखल न घेतल्यास २० मे रोजी बुलडाणा जिल्हा बंद पाळण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. जिल्हाध्यक्ष आ.बोंद्रे यांच्या नेतृत्वात उपोषण मंडपास अनेक मान्यवरांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला़ यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
राहुल बोंद्रे यांच्यासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे उपोषण
By admin | Published: May 19, 2017 12:14 AM