बुलडाणा : स्थानिक सर्क्युलर रस्त्यावरील अवैध सावकाराच्या राहत्या घरावर धाड टाकून मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्रीचे व्यवहार व अवैध सावकारीच्या अनुषंगाने कोरे धनादेश व बॉण्ड जप्त करण्यात आले. सहाय्यक निबंधक गितेशचंद्र साबळे यांच्या नियंत्रणाखाली सहकार व पोलिस विभागातील कर्मचाºयांच्या पथकाने १६ एप्रिल रोजी सकाळी १०.५० वाजता ही कारवाई केली. या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहे. मोताळा तालुक्यातील गुळभेली येथील जयराम दळवी यांनी येथील विपीन जुगलकिशोर चिरानिया यांच्याविरुद्ध अवैध सावकारी व्यवहारासंदर्भात जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. तक्रारीच्या चौकशीकरिता १६ एप्रिल रोजी सहकार व पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने गैरअर्जदाराच्या घरावर धाड टाकली. सोमवारी सकाळी १०.५० वाजता पंचासमक्ष कारवाईला सुरुवात झाली तर दुपारी १ वाजता ही कारवाई पूर्ण करण्यात आली. झडती पथकाने घराची बैठक, स्वयंपाक घर, बेडरुम, वरच्या मजल्यावरील खोल्यांमधील लोखंडी व लाकडी कपाट, अलमारी, पलंग, खोके, धान्याचे डबे, सुटकेस, बॅग्स यामधील कागदपत्र व दस्तऐवज जप्त केले. झडती पथकामध्ये सहाय्यक निबंधक सहकारी संस्था चिखली गितेशचंद्र साबळे, विशेष लेखापरिक्षक डी. पी. जाधव, जी. जे. आमले, डी. आर. इटे, वाय. एम. घुसळकर, एस. एस. शिवणकर, एस. एन. हिवाळे, महिला पोलिस संगीता सोरमारे, ना. नि. खर्चे, व्ही. पी. बल्हारे आदी अधिकारी व कर्मचाºयांचा समावेश होता. या कारवाईत विपीन जुगलकिशोर चिरानिया यांच्या घरातून खाजाखान बिसमिल्लाखान यांच्या सह्याचे स्टेट बँकेचे तीन कोरे धनादेश, नितीन धुले यांच्या सहीचा आयसीआयसीआय बँकेचा कोरा धनादेश व १०० रुपयांचा कोरा स्टॅम्पपेपर, रामेश्वर चिरानिया यांच्या स्थावरचे खरेदीखत, व्याजाचा व व्यवहाराच्या नोंदी असलेले हिशोबाचे रजिस्टर, हिशोब व व्याजाच्या नोंदी असलेले गुलाबी पाकीट, काळ्या रंगाची डायरी, खरेदी खत बलन दस्त क्रमांक जांभरुण येथील प्लॉटची १०० रुपयांच्या स्टॅम्पवर इसारपावती यासह अवैध सावकारीच्या अनुषंगाने १९ प्रकारची कागदपत्रे जप्त करण्यात आली. याबाबत जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण व जिल्हा विशेष लेखापरीक्षक गवळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती सहाय्यक निबंधक गितेशचंद्र साबळे यांनी दिली.
अशी होते पथकाची नियुक्ती
अवैध सावकारीसंदर्भात तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधकांच्या मार्गदर्शनात संयुक्त पथक नियुक्त करण्यात येते. या पथकामध्ये सहकार, पोलिस व इतर शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाºयांचा समावेश असतो. अत्यंत गुप्तपणे ही प्रक्रिया राबविली जाते. प्रत्यक्ष धाड टाकण्यापर्यंत तक्रारदाराचे नाव गुपीत ठेवण्यात येते.
झडतीची दिली जाते नोटिस
अवैध सावकारी प्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर झडती पथक संबंधित व्यक्तीच्या घरी पोहोचते. तिथे गेल्यानंतर घरमालकास तपासणीसंदर्भात नोटिस देण्यात येते. त्यानंतर पथकातील कर्मचारी पंचासमक्ष स्वत:ची अंगझडती देऊन गैरअर्जदाराच्या घराच्या झडतीला सुरुवात करतात. तपासणीत मिळालेली कागदपत्रे जप्त केली जातात.