धाड : गावातील अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी सातगाव येथील महिलांनी धाड पाेलीस स्टेशनला निवेदन दिले हाेते. त्यावर पाेलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने गावात देशी दारूची विक्री सुरूच हाेती. त्यामुळे शुक्रवारी महिलांनी ग्रामस्थांसह अवैध देशी दारू विक्रीवर छापा टाकला. या वेळी दाेन आराेपींना पाेलिसांच्या ताब्यात देण्यात आले़
धाड येथून तीन किमी अंतरावर असलेल्या सातगाव येथे गत काही दिवसांपासून अवैध देशी दारूची माेठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. गावातील दारू विक्री बंद करण्याची मागणी महिलांनी एक महिन्यापूर्वी धाड पाेलिसांना दिलेल्या निवेदनात केली हाेती. मात्र, स्थानिक पाेलिसांनी त्यावर कुठलीही कारवाई केली नाही. तसेच गावात देशी दारूची विक्री सुरूच हाेती. त्यामुळे महिला आणि नागरिक त्रस्त झाले होते. अखेर ग्रा.पं. सातगाव यांनी देशी दारूच्या विक्रीविरोधात स्वतंत्र ठराव घेऊन पोलिसांना परत कारवाई करण्याची मागणी केली हाेती. मात्र, तरीही पोलिसांनी अवैध देशी दारूवर कारवाई केली नाही. अखेर गावातील संतप्त महिला आणि नागरिकांनी ८ जुलै रोजी रात्री ९ वा. सुमारास एकत्रितपणे अवैध देशी दारूच्या विक्री अड्ड्यावर छापा घालून दोन आरोपींना पकडून तत्काळ धाड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत प्रत्यक्ष पाहणी केली असता असंख्य नागरिकांनी व महिलांनी आपला रोष व्यक्त केला. त्या दोन आरोपींना पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, यातील एक आरोपी पळून गेला. पाेलिसांनी पंचनामा करून आरोपी प्रमोद देविदास रत्नपारखी आणि प्रमोद गजानन यंगड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़
देशी दारूची खुलेआम विक्री
धाड भागात देशी दारूची खुलेपणाने सर्रासपणे विक्री सुरू आहे. अनेक गावांतील नागरिकांनी अवैध देशी दारूच्या विक्रीसंदर्भात येथील पोलिसांना तक्रारी दिलेल्या आहेत. मात्र, त्यावर कुठलीही कारवाई हाेत नाही. अखेर नागरिकांनी त्रस्त होऊन देशी दारूची विक्री करणाऱ्यावर छापा घालून आरोपी पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत.
सातगावमध्ये अनेक दिवसांपासून देशी दारूची अवैध विक्री करण्यात येत आहे आणि पोलिसांना वारंवार तोंडी व लेखी स्वरूपात निवेदन देण्यात येऊन कारवाई करण्याची मागणी केली, परंतु पोलिसांनी आजवर काहीही कारवाई केली नाही.
नीलेश देठे, जिल्हा उपाध्यक्ष, बुलडाणा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी