बुलडाणा: महाराष्ट्र सावकारी अधिनियमातंर्गत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला प्राप्त झालेल्या पाच अवैध सावकारी बाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने सहकार विभागाने बुलडाणा, खामगाव, चिखली आणि शेगाव तालुक्यात दहा ठिकाणी छापे मारून आक्षेपार्ह्य कागदपत्रे जप्त केली आहे. दरम्यान, २६ एप्रिल रोजी झालेल्या या कारवाईत सहकार विभागातील प्रशासन व लेखा परिक्षण विभागातील आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे असे मिळून तब्बल ७० अधिकारी कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता.तब्बल दहा ठिकाणी हे छापे टाकून २६ एप्रिल रोजी ही कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये बुलडाणा येथे सहा पथकांनी कारवाईत सहभाग घेतला होता. त्यात सुशील सुभाषराव देशमुख (रा. बुलडाणा) यांच्या घरी नोंदणीकृत खरेदी खते, ताबे इसार पावती, मुदत वाढीचे लेखे, प्रतिज्ञा लेख असे आक्षेपार्ह्य दस्ताऐवज मिळून आले. दरम्यान त्यांच्या दुकानावर नोंदणीकृत खरेद्या, गहाणखत, चेकबुक असे दस्त मिळाले असल्याचे सहकार विभागाने सांगितले. दरम्यान सुवर्णनगरमधील प्रितपालसिंग सोनुसिंग सेठी यांच्याकडेही घरी आणि गुरुनाक गेस्ट हाऊस येथे छापे मारून कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. यामध्ये नोंदणीकृत खरेदीखते, कोरे चेक, कोरे स्टॅम्पपेपर, प्रतिज्ञालेख असे आक्षेपार्ह्य साहित्य मिळून आले. दरम्यान, बुलडाणा शहरातीलच भगवान महाविर मार्गलगत प्रितेश सुरेश संचेती यांच्या घरी व कार्यालयात झडती घेण्यात आली. तेथून १०० रुपयाचे स्टॅम्पपेपर, भागीदारी करारनामा आढळून आला असून ही कागदपत्रे पथकाने ताब्यात घेतली आहेत.दरम्यान, खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील शोभाबाई वासुदेव बोंबटकर आणि शेगाव राम भीमराव पांडे व संजय भीमराव पांडे (रा. रोकडीया नगर) येथेही छापे टाकून खरेदी खत, संमतीपत्र व सौदाचिठ्ठी आदी दस्तऐवज तपासण्यात आले आहेत. चिखली येथील नसीमशेख हारून (वार्ड. नं. २१, भीमनगर) आणि काजल आसिफ नुरखाँ यांच्याकडे (जु्न्या तहसिल कार्यालयासमोर) येथेही तपासणी करण्यात येऊन ताबेपावती, संमतीपत्र, इसारपावत्या व खरेदीखते अशी दस्ताऐवज मिळून आले. दरम्यान, सहकार विभागाने केलेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यात अवैध सावकारी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
७० अधिकारी कर्मचार्यांचा ताफाजिल्ह्यात २६ एप्रिल रोजी धडकपणे हे छापे टाकण्यात आले असून या मध्ये जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, जिल्हा उपनिबंधक (सावकारी) नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी एकचे सहकार अधिकारी जी. जे. आमले, सहकारी संस्थेचे विशेष लेखापरीक्षक डी. पी. जाधव, डी. आर. इटे, सहाय्यक निबंधक ए. बी. सांगळे, आर. टी. अंभोरे, एस. डी. नरवाडे, ओ. एस. साळुंके, लेखा परीक्षक ए. पी. हिवरखेडे, सहाय्यक निबंधक जी. पी. साबळे, सहकार अधिकारी आर. आर. सावंत यांनी ही कारवाई केली.