लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी आज पं.स.मध्ये जाऊन प्रत्येक विभागाची झाडाझडती घेत, गैरहजर तसेच ग्रामसेवक व जनसामान्यांना त्रास देणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल तीव्र नाराजी दर्शवित मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे याबाबत दूरध्वनीवरून चर्चा केली.२९ मे रोजी पंचायत समिती शिवसेनेचे सदस्य निंबाजी पांडव हे त्यांच्या गणातील एका व्यक्तीच्या घरकुलाच्या कामासाठी पं.स. मध्ये आले असता, त्यांना काही अधिकारी, कर्मचारी हजर दिसले नाही. त्यांनी तत्काळ ही बाब आ.संजय रायमुलकर यांना कळविली. तेव्हा आ. संजय रायमुलकर हे तालुकाप्रमुख सुरेश वाळूकर, शहरप्रमुख तथा न.पा.उपाध्यक्ष जयचंद बाठिया, उपतालुकाप्रमुख समाधान साबळे, रमेश देशमुख, जि.प. गटनेते आशिष रहाटे, सभापती जया कैलास खंडारे यांना घेऊन पं.स.मध्ये आले. त्यांनी प्रत्येक विभागात जाऊन उपस्थिती घेतली. त्यानंतर सभापती कक्षात उपस्थित ग्रामस्थांनी तक्रारीचा पाढा वाचला. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना, घरकुल, विहीर अधिग्रहण, टँकर प्रस्ताव, शेततळे, विहीर तसेच विविध योजनांबाबत संबंधित अधिकारी, कर्मचारी व्यवस्थित बोलत नाहीत. उडवाउडवीचे उत्तरे देतात. कामाला विनाकारण विलंब करतात. अशा तक्रारी आ. रायमुलकरांना ऐकायला मिळाल्या. सर्वात जास्त तक्रारी ग्रामसेवकांबद्दल होत्या. हा सर्व प्रकार ऐकून आ. संजय रायमुलकर संतप्त झाले. त्यांनी मोबाइलवरून मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्याशी याविषयी चर्चा केली व लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. सहायक गटविकास अधिकारी अशोक सानप यांनासुद्धा बोलताना आ. संजय रायमुलकर म्हणाले, की दर सोमवारी प्रत्येक विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर ठेवावे, ग्रामसेवकांना व रोजगार सेवकांना जनतेच्या समस्या सोडविण्याबाबत कडक आदेश द्यावेत, पाणीटंचाईचा प्रश्न गांभीर्याने घ्यावा, घरकुल योजनेचे ज्यांचे हप्ते थकीत आहेत. ते तत्काळ देण्यात यावेत, पं.स.मध्ये येणाऱ्या लाभार्थीस योग्य वागणूक मिळावी, त्यांच्या कामास विलंब होऊ नये, याची दक्षता घ्यावी, सभापतींच्या आदेशाचे सर्वांनी पालन करावे, कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुटीच्या वेळेव्यतिरिक्त कार्यालयातच हजर राहण्याचे आदेश द्यावेत, ही अंमलबजावणी तत्काळ न झाल्यास शिवसेना स्टाइलने आम्ही आंदोलन करू, असा इशाराही आ. संजय रायमुलकर यांनी यावेळी दिला.
रायमुलकरांनी घेतली मेहकर पं.स.ची झाडाझडती!
By admin | Published: May 30, 2017 12:22 AM