बुलडाणा : कोरोना संसर्गाचा घसरलेला आलेख, सैल झालेले निर्बंध व आगामी सणासुदीचे दिवस यामुळे रेल्वेची प्रवासी संख्या वाढली आहे. गौरी, गणपती सणानिमित्त घर गाठणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाल्याने मुंबई, पुणे व नागपूरकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमध्ये आरक्षण फुल झाले आहे. दररोज तब्बल ११२ एक्स्प्रेस गाड्या सुरू आहे. यापैकी बहुतांश गाड्यांचे आरक्षण फुल आहे.
मुंबई- पुण्याचे तिकीट मिळेना
शेगाव, नांदुरा आणि मलकापूर रेल्वेस्थानकावरून प्रामुख्याने मुंबई व पुण्याच्या दिशेन प्रवास करणाऱ्याची संख्या अधिक आहे. सणासुदीच्या दिवसात या मार्गावरील गाड्यांमध्ये नेहमीच गर्दी पाहावयास मिळते. विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती एक्स्प्रेस, गीतांजली एक्स्प्रेस या मुंबईकडे जाणाऱ्या, तर महाराष्ट्र एक्स्प्रेस, हावडा-पुणे स्पेशल या पुण्याकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये आगामी तीन ते चार दिवस आरक्षण फुल आहे.
सध्या सुरू असलेल्या गाड्या
०२१०५ मुंबई - गोंदिया
०२११ मुंबई - अमरावती
०१०३९ कोल्हापूर - गोंदिया
०२८०९ मुंबई - हावडा
०२१६९ मुंबई - नागपूर
०२२८० हावडा - पुणे
०२८३३ अहमदाबाद - हावडा
पॅसेजर गाड्यांची प्रतीक्षा कायमच
रेल्वे प्रशासनाने एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत़ मात्र, अजूनही पॅसेजर गाड्यांची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र आहे़ बुलडाणा जिल्ह्यात नागझरी, शेगाव,जलंब,नांदुरा, खुमगाव बुर्टी, चांदुर बिस्वा, मलकापूर आदी स्थानकावरुन माेठ्या प्रमाणात प्रवाशी पॅसेजरने प्रवास करतात़ एक्स्प्रेस बंद असल्याने प्रवाशांना नाहकचा भुर्दंड सहन करावा लागत आहे़ रेल्वे प्रशासनाने पॅसेजर गाड्या सुरू करण्याची मागणी हाेत आहे़
ना मास्क, ना फिजिकल डिस्टन्सिंग
कोरोनाची लाट ओसरल्यामुळे नागरिकांमध्ये बेफिकिरी वाढली.
रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाड्यांमध्येही कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडविले जात असल्याचे चित्र आहे.
अनेकांच्या तोंडावर मास्क दिसत नाही. गर्दी असल्याने फिजिकल डिस्टन्सिंगचाही बोजवारा उडत आहे.
अशीच परिस्थिती राहिली तर कोरोनाचा आलेख पुन्हा उंचावण्याची भीती नाकारता येत नाही.