- सुहास वाघमारे
नांदुरा - भाऊबीजेच्या दिवशी उसळलेल्या गर्दीत जळगाव जामोद रस्त्यावरील रेल्वेगेट सतत पंचवीस मिनेटे बंद राहिल्याने वाहतुकीची कोंडी झाली. त्या वाहनांची रांग राष्ट्रीय महामार्गावर लागल्याने दोन्ही मार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प झाली. सोमवारी दुपारी साडेबारा ते दोन वाजताच्या दरम्यान अनेकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. त्यातच लगतच्या इमारतीमध्ये असलेल्या मधमाशा उठल्याने अनेकांना चावा घेतला. त्यावेळी एकच गोंधळ झाला. पाेलिसांनी धाव घेत वाहतूक मोकळी करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत बराच कालावधी निघून गेला होता.
नांदुरा शहरातून बाहेर पडताना जळगाव जामोद रोडवर राष्ट्रीय महामार्गाजवळच रेल्वे गेट आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता रेल्वेगेट बंद झाले. सतत पंचवीस मिनिटे बंद होते. त्यामुळे रेल्वे गेटच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या मोठय़ा रांगा लागल्या. शहरात जाणाऱ्या वाहनांची रांग राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहचली. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील दोन्ही बाजूने तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या. तर जळगाव जामोद रोडवर वाहनांची मोठी कोंडी झाली होती. त्यातच रेल्वेगेट उघडल्याने पुन्हा कोंडीत वाढ होऊन वाहतूक पुन्हा ठप्प झाली. रेल्वेगेटच्या मधोमध वाहने अडकली. त्यामुळे रेल्वेची वाहतूकही काही काळ प्रभावित झाली. रेल्वेगाडी आल्याने रुळावरील वाहने मोठ्या शिताफीने आजूबाजूला लावण्यात आली. दीड तासाच्या या वाहतूक कोंडीनंतर पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले. पोलिसांसोबतच समाजसेवींनी पुढे येऊन राष्ट्रीय महामार्गावरील एकेरी वाहतूक सुरू केली. सुमारे दोन तासानंतर वाहतूक पूर्ववत झाली. वाहतुकीची कोंडी हॉर्नचे कर्कश आवाज लहान मुलांच्या किंकाळ्या यामुळे सर्वच त्रस्त झाले होते. भाऊबिजेनिमित्त मामाच्या घरी निघालेल्या चिल्ल्यापिल्ल्यांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला.
वाहतूक कोंडीत मधमाश्यांचा हल्ला
रेल्वे गेटला लागून असलेल्या उंच कॉम्प्लेक्सवर दोन मधमाश्यांचे पोळे आहेत. त्या मधमाशा दुपारच्या वेळेस पोळ्यातून उठून हल्ला करतात. साेमवारी वाहतूक कोंडी असताना पुन्हा मधमाशांनी हल्ला केला. वायर तुटल्याने अनेक व्यावसायिकांनी त्यांची दुकाने बंद केली तर वाहतूक कोंडीत अडकलेल्यांनी वाहनांमध्ये धाव घेऊन बचाव केला. मधमाशांचे पोळे हटवणे गरजेचे असतानाही त्याकडे दुर्लक्ष करणार्या संकुल मालकावर कारवाई करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली.