बुलडाणा : गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल होऊन विजेच्या कडकडाटासह काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या. साखरखेर्डा परिसरात गारा पडल्या.शनिवार, २६ मार्च रोजी वातावरणात अचानक बदल होऊन सायंकाळी आकाशात काळेकुट्ट ढग जमा झाले. तर सायकाळी विजांच्या कडकडाटासह बुलडाणा शहर व परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रविवारी सायंकाळच्या सुमारास साखरखेर्डा परिसरात वादळी वार्यासह अवकाळी पाऊस झाला. त्यामध्ये सवडद, मोहाडी, राताळी, शिंदी, गुंज, वरोडी, उमनगाव, गोरेगाव, पांग्रीकाटे, लिंगा, सायाळा, बाळसमुद्र, तांदूळवाडी, पिंपळगाव सोनारा व साखरखेर्डा येथे अवकाळी पाऊस झाला. तर तांदूळवाडी, पिंपळगाव सोनारा या भागात गारपीट झाली. वादळी वार्याचा जोर अधिक असल्याने साखरखेर्डा, शेंदुर्जन रोडवर मोठय़ा प्रमाणावर वृक्ष उन्मळून पडले होते. तसेच विद्युत तारा तुटल्याने परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला. खामगाव शहर व तालुक्यातील काही भागात रविवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. चिखली तालुक्यात काही भागात पावसाच्या सरी कोसळल्या तर, मेहकर तालुक्यात केवळ पावसाचे वातावरण होते.
बुलडाणा जिल्ह्यात पावसाच्या सरी
By admin | Published: March 28, 2016 2:06 AM