लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात शनिवारी रात्री अनेक दिवसानंतर पावसाने हजेरी असून रात्रीतून २१.३ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या या पुनरागमनामुळे पिकांना काहीसा आधार मिळाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २४१.२ मि.मी. म्हणजे सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत ३५.१२ टक्के पाऊस झाला आहे. विजांच्या कडकडाटासह जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले. या पावसामुळे तापमानही खाली आले आहे.जिल्ह्यात खरीप हंगामाची ८५ टक्क्यापेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी आटोपली आहे. मृग आणि आद्रा नक्षत्राच्या जोडावर सुरू झालेल्या पावसाने खरीप पेरणीला सुरूवात करून दिली होती. हा पाऊस जवळपास जून अखेरचा आठवडा व जुलैच्या सुरूवातीला काही दिवस राहिला. यामध्ये जिल्हाभर कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या १५ दिवसांपासून पावसाने उघाड दिल्याने शेतकरी पिकांची परिस्थीती गंभीर होती. मूग, उडीद, सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांनी शेत अगदी हिरवेगार दिसून येत होती. परंतू पावसाअभावी दुपारच्या वेळी ही पिके सुकलेली दिसायची. अनेक ठिकाणी वरूण राजासाठी शेतकरी साकडे घालत असल्याचे चित्र पहायला मिळाले.पावसाची नितांत आवश्यकता असताना शनिवारी रात्री ८ वाजेदरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचे पुनरागमन झाले. जिल्ह्यात आतापर्यंत २४१.२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी रात्री दरम्यान झालेल्या या पावसाने अनेक ठिकाणचे पिके वाचली. या पावसाने आणखी काही दिवसांसाठी पिकांचा धोका टळला. पावसाच्या या पुनरागमनामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, पिकांसाठी हा पाऊस संजीवनी ठरला आहे. पुढील आठवड्यातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
पावसाच्या पुनरागमनाचा पिकांना मिळाला आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 2:46 PM