किनगावराजा परिसरात जून महिन्यात पाऊस पडला नाही. त्यामुळे अपुऱ्या पावसात धाडसाने काही शेतकऱ्यांनी आपापली पेरणी केली, परंतु पावसाने दीर्घकाळ दडी दिल्यामुळे जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली आहे. दरम्यान, दहा टक्के शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस पडला नसल्याने जून महिन्यात पेरणी केली नव्हती. खरीप हंगामात मुख्यतः सोयाबीन, तूर, उडीद, मका, हायब्रीड ज्वारी, तसेच कपाशी पिकांची लागवड शेतकरी करतात. त्यातील मूग, उडीद, हायब्रीड ज्वारीच्या पेरणीचा हंगाम जूनच्या शेवटच्या आठवड्यातच संपला असल्याने, सध्या फक्त सोयाबीन, तूर आणि संपूर्ण वर्षाचे पीक असलेल्या कपाशीचीच लागवड करता येत आहे. त्यानुसार, १३ जुलैपासून या परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती. त्यांनी पावसाने उघडीप दिल्यावर लगबगीने सोयाबीन, तुरीची पेरणी, तसेच कपाशीची लागवड केली आहे.
उत्पादन घटण्याची शक्यता
पावसाने दांडी मारल्याने परिसरातील १० टक्के शेतकऱ्यांची पेरणी शिल्लक राहिली हाेती. जुलैच्या महिन्यात पेरणी झाल्याने उत्पादन घटण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. या परिसरातील जवळपास १०० टक्के शेतकऱ्यांनी सध्या संपूर्ण पेरणी केली असून, येणाऱ्या पिकांच्या मशागतीसाठी सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे.