लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : यंदाच्या पावसाळ्यातील सार्वत्रिक स्वरूपाचा पहिलाच पाऊस बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात झाला आहे. दरम्यान, आगामी चार दिवस जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा सार्वत्रिक स्वरूपातील पाऊस पडण्याची शक्यता असून, या पावसानंतरच शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पेरणी करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, असे जिल्हा कृषी हवामान केंद्राने स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३४.६ मि.मी. पाऊस पडला असून, बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६.५ मि.मी. पाऊस झाला आहे. यामध्ये सर्वाधिक पाऊस हा चिखली ३९.६ मि.मी., खामगाव ३५.२, मेहकर ३१, सि. राजा २३.२, नांदुरा २१.६ मि.मी., बुलडाणा ८.२ मि.मी. याप्रमाणे झाला आहे. शेगाव तालुक्याचा अपवाद वगळता अन्य १२ तालुक्यांत या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. वार्षिक सरासरीच्या पाच टक्के पाऊस आतापर्यंत जिल्ह्यात झाला आहे. जिल्ह्यात दरवर्षी सरासरी ७६१.६ मि.मी. पाऊस पडतो.या पावसामुळे शेतकऱ्यांनी आता पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपती घेतली असून बी-बियाणे खरेदीसह पेरणीची पूर्वतयारी केली आहे. मात्र अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर्तास पेरणी करणे टाळावे, असे जिल्हा हवामान केंद्राने म्हटले आहे.दरम्यान, मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर पुढील तीन दिवसांत विदर्भ व्यापण्यास मान्सूनला वेळ लागतो. त्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यात १० जून ते १३ जूनदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे. हा पाऊस पडल्यानंतरच शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने पेरणी करावी की नाही, याचा निर्णय घेता येईल, असे कृषी हवामानतज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यात या वर्षी सात लाख ३८ हजार हेक्टरवर खरिपाच्या पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे.
पेरणी केव्हा करावी?साधारणत: ७५ मि. मी. ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतर जमिनीमध्ये एक ते दीड फुटापर्यंत ओल येेते. ती आल्यासच शेतकऱ्यांनी पेरणी करण्याचा निर्णय घ्यावा. या ओलाव्यातच बी रुजू शकते. अन्यथा जमिनीत टाकलेले बी सडण्याची शक्यता असते. तसे झाल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या भरोशावर पेरणी करणे टाळावे, असे मनेश यदुलवार यांनी सांगितले.