- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा : जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झालेली आहे. सध्या सोयाबीनसह इतर काही पिके फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहेत. परंतु पावसाने ओढ दिल्याने जमिनीतील ओलावा कमी झाला आहे. अनेक ठिकाणी जमिनीला भेगा पडल्याचे दिसून येत आहे. पाण्याअभावी पिकांवर फूलगळचा धोका वाढला आहे. पिके वाचविण्यासाठी शेतकरी सिंचन करण्याची धडपड करीत आहेत. जिल्ह्यात मागील महिन्यात पावसाने चांगली हजेरी लावली होती. परंतु हा पाऊस सार्वत्रिक नव्हता, त्यामुळे मागील महिन्यातच पिकांना दमदार पावसाची आवश्यकता होती. त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील ओल अत्यंत कमी झालेली आहे. माळरानावरील पिकांनी तर माना टाकल्या आहेत. पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी सिंचनाची व्यवस्था करत आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था नाही, त्यांची पिके मात्र संकटात सापडली आहेत. कुठल्याही पिकाचे भरघोस उत्पादन मिळण्यासाठी पिकामध्ये अधिक फूलधारणा होणे गरजेचे आहे.
सध्या पाऊस लांबल्याने पिकांना पाणी देणे आवश्यक झाले आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने फूलगळ होऊ शकते. पिकांना सिंचन करताना काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी २४ तास स्प्रिंक्लर चालू ठेवूनही देऊ नये. पाणी योग्य प्रमाणात द्यावे.- सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ज्ञ