सदानंद सिरसाट, नांदुरा (बुलढाणा) : तालुक्यातील लोणवडी, खडदगाव, पिंपळखुटा धांडे व माळेगाव गोंड या चार गावांत शनिवारी रात्री ढगफुटीसदृश्य मुसळधार पावसामुळे शेतांचे तलाव झाले. नदी व नाल्याच्या काठावरील जमिनी खरडून गेल्या, तर लोणवाडी व खडदगाव येथील जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील वडनेर परिसरात ८१.५ मिमी, तर महाळुंगे परिसरात ८० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामध्ये १२५ घरांची पडझड, तर ७६ जनावरे वाहून गेल्याची माहिती तहसीलदार दिगंबर मुकुंदे यांनी दिली.
सोयाबीन व कपाशीचे पीक शेतात बहरली असताना, शनिवारी रात्री नांदुरा तालुक्यातील गावांमध्ये सतत तीन तास ढगफुटीसदृश्य पाऊस धो-धो कोसळला. सकाळपर्यंत परिसरातील सर्व शेती जलमय झाली. रविवारी दुपारपर्यंतही शेतामध्ये साचलेल्या पाण्यात पिके बुडाली होती. शेतात पाणी साचल्यामुळे सोयाबीन कपाशी व तूर पिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, तालुक्याच्या इतर भागात पावसाचा जोर कमी होता. खळदगाव परिसरातील शेतांमध्ये साचलेले पाणी विहिरींमध्ये उतरल्याने विहिरी काठोकाठ भरल्याचे दिसून आले. परिसरातील नदी व नाले ओसंडून वाहिल्याने काठावरील शेतजमीन खरडून गेली. तालुक्यातील लोणवाडी नाल्याच्या पुराचे पाणी काठावरील गुरांच्या गोठ्यातून वाहिल्याने या गावातील म्हशी, गाई, बकरा व कोंबड्या वाहून गेल्या, तर खुंट्याला बांधले असल्याने काहींचा जागीच मृत्यू झाला. नाल्याचे पाणी घरात घुसल्याने लोणवाडी येथील घरांचेही नुकसान झाले. या पावसाने झालेल्या नुकसानीची आमदार राजेश एकडे यांनी पाहणी करून, प्रशासनाला सूचना केल्या आहेत.
- लोणवाडी लघुप्रकल्प तुडुंब
ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळल्यामुळे नेहमीच अत्यल्प जलसाठा असणारा लोणवाडी लघुप्रकल्प तुडुंब भरला. या लघुप्रकल्पात ७० टक्के जलसाठा झाला आहे. या लघुप्रकल्पात मागील काही वर्षांत दुसऱ्यांदा जलसाठा झाल्याची माहिती परिसरातील शेतकऱ्यांनी दिली.
- पिके व जनावरे दगावल्याने दुहेरी नुकसान
ढगफुटीसदृश्य पावसामुळे लोणवाडी येथील शेतकऱ्यांच्या शेतांचे तलाव झाले. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. नाल्याच्या पुरात जनावरे वाहून गेल्याने दुहेरी नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे.