लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा आणि मलकापूर पांग्रा परिसरात गारपिटीसह पाऊस पडल्याने गहू, हरभरा, ज्वारी या खरीप पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करण्याचे आदेश तहसीलदार संतोष कनसे यांनी दिले आहेत. सकाळी ७ वाजता सूर्योदय होत असताना आकाशात ढगाळ वातावरण निर्माण झाले. काही वेळातच विजांसह पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, सिंदखेडराजा तालुक्यातील गुंज, वरोडी, गुंजमाथा, सावंगी भगत, गोरेगाव, काटेपांग्री, उमनगाव, सायाळा, लिंगा, शेंदुर्जन, राजेगाव, कंडारी, भंडारी, जागदरी, दरेगाव, तांदूळवाडी, बाळसमुद्र, आंबेवाडी, हिवरा गडलिंग, हनवतखेड, वाघाळा या गावात मोठय़ा प्रमाणात गारपीट झाली. गहू, हरभरा, ज्वारी ही रब्बीची पिके नुकतीच सोंगणीला आली होती. सोंगणीपूर्वीच पावसाने आणि गारपिटीने जबर तडाखा दिल्याने शेकडो हेक्टरमधील पिकाला फटका बसला आहे. काटेपांग्री येथील दिलीप थिगळे या शेतकर्याच्या शेतातील गहू पूर्णपणो झोपल्याने प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळामुळे नेटची शेती करणार्या शेतकर्यांची नेट उडाल्याने त्यांचेही मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानाचा प्राथमिक सर्व्हे करण्याचे आदेश पटवार्यांना दिले असून, नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी सुरू केली आहे. काही भागात आ.डॉ. शशिकांत खेडेकर, कृषी सभापती दिनकरराव देशमुख यांनी पाहणी केली आहे. त्याचबरोबर डाळिंब बागालाही फटका बसला असून, डाळिंब फळावर विपरीत परिणाम होणार आहे, अशी माहिती अनंता शेळके यांनी दिली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात पावसाचा तडाखा; पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 1:11 AM