मेहकर : शहराला लागून असलेल्या वीटभट्टय़ांवर शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालतो, परंतु १0 मार्चला झालेल्या अवकाळी पावसाने येथील वीटभट्टीवरील विटांची माती झाली आहे. या अवकाळी पावसाचा वीटभट्टय़ांना जबर फटका बसल्याने व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येथील कंचनीच्या महालाजवळ गत ३0 ते ३५ वर्षांपासून वीटभट्टय़ांचा व्यवसाय सुरू आहे. सतत चार ते पाच महिने हा व्यवसाय सुरू असतो. या वीेटभट्टय़ांवर परिसरातील शेकडो मजुरांचे कुटुंब चालतात. पैनगंगा वीटभट्टीचे संचालक भास्कर सावळे, यशवंता बनचरे, इस्माईल शाह, अब्दुल शाह, अलियार खान, सादिक अली, अब्दुल मन्नान, इस्माईल खान, अब्बास खान, सै. हमीद सै. मुस्तफा, शे. युनूस शे. ताहेर आदींचा याठिकाणी वीटभट्टीचा व्यवसाय आहे. वीटभट्टीचा व्यवसाय करीत असताना या व्यावसायिकांना शासनाकडून कोणत्याच प्रकारची योजना तथा अर्थिक मदत मिळत नाही. ते स्वत:च हजारो रुपये खर्च करून वीटभट्टय़ांचा व्यवसाय करीत आहेत. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसाने या वीटभट्टय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने वीटभट्टय़ांवरील विटांची माती झाली असून, वीटभट्टीधारकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे वीटभट्टीचे काम बंद पडले आहे. प्रत्येकी वीटभट्टी व्यावसायिकांचे ५0 ते ६0 हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शासनाकडून व्यवसायिकांना अर्थिक मदत मिळावी, अशी मागणी भास्कर सावळे, यशवंता बनचरे, इस्माईल शाह, अब्दुल शाह, अलियार खानसह वीटभट्टी व्यावसायिकांनी १२ मार्च रोजी केली आहे.
वीटभट्टय़ांना पावसाचा फटका
By admin | Published: March 13, 2015 1:46 AM