बुलडाणा : जिल्ह्यात गेल्या पाच ते सात दिवसांपासून पावसाने ओढ दिली असू, जिल्ह्यातील पावसाची तूट ११ टक्क्यांवर पोहोचली आहे. त्यामुळे जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकण्याची भीती आहे. जून महिन्यातून नऊ दिवस पाऊस पडला आहे; तर जुलै महिन्यात साधारणत: १६ दिवस पाऊस पडतो. मात्र जुलै महिन्यातच पावसाने अेाढ दिली आहे. परिणामी खरीप हंगाम धोक्यात आल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडतो. त्यानुषंगाने ७ जुलैपर्यंत जिल्ह्यात साधारणत: २३३.३ मिमी सरासरी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र प्रत्यक्षात १३९.३ मिमीच पाऊस पडला आहे. पावसाच्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत जवळपास ११ टक्के तूट आहे. त्यातच प्रकल्पांमध्येही सध्या अवघा २७ टक्के जलसाठा आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाच्या सुविधा आहेत, ते शेतकरी स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिके जगविण्याचा प्रयत्न करत आहेत. जिल्ह्यातील काही भागात तर पिकांनी आता माना टाकल्याचे एकंदरीत चित्र आहे. त्यामुळे आता जर पावसाने आणखी ओढ दिली, तर खरीप हंगाम धोक्यात येण्याची भीती आहे. पिकांच्या वाढीच्या निर्णायक काळातच पावसाने ओढ दिली आहे.
३० टक्के पेरण्या रखडल्या
जिल्ह्यात आतापर्यंत ७ लाख ३४ हजार १७७.२२ हेक्टरपैकी ५ लाख १४ हजार ४२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण उद्दिष्टाच्या त्यात ७० टक्के आहेत. त्यामुळे अद्यापही ३० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. त्यासाठी आता दमदार पावसाची गरज आहे. अशीच परिस्थिती राहिली तर यंदा उत्पादन घटण्याची भीती आहे.
तूर, मका पिकाला प्राधान्य द्यावे
पावसाची ओढ व ११ टक्के तूट पाहता, शेतकऱ्यांनी पिकांच्या जीवनचक्राचा विचार करता तूर, मका, सूर्यफूल, सोयाबीनसारख्या पिकांना आता प्राधान्य देण्याची गरज आहे. मूग, उडीद पेरल्यास सप्टेंबर महिन्यादरम्यान येणाऱ्या परतीच्या पावसाचा या पिकांना फटका बसू शकतो, असे कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी स्पष्ट केले. यासोबतच एकच पीक न पेरता शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा, असेही ते म्हणाले.
गत ३ वर्षांतील पावसाची स्थिती
महिना सरासरी पडणारा पाऊस पावसाचे दिवस प्रत्यक्ष पडलेला पाऊस (मिमीमध्ये)
२०१९ २०२० २०२१
जून १३९.३ १३४.६ (९) १८९.२ (१६) १८०.४ (७ते ९)
जुलै १९२.२ १९९.४ (१६) २१३.४ (१७) ---
ऑगस्ट २०७.४ १४५.३ (०९) २०८.४ (१९) ---
सप्टेंबर १२०.५ २१४.२ (१८) १५७.३ (१२) ---
ऑक्टोबर ५७.३ ९९.९ (१२) ४२.१ (४) ---