दुसरबीड : मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली आहे. मात्र, गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवलेच नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच चांगला पाऊस झाला हाेता. त्यामुळे, शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी मशागत पूर्ण केली हाेती, तसेच ओल जास्त असल्याने अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी करून पेरणी केली हाेती. जमिनीमध्ये पेरलेले बियाणे अचानक पावसाने उघडीप दिल्यामुळे उगवले नाही. जून महिना संपत आला असला तरी पावसाची कुठलीही शक्यता नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. काही लोकांनी आपल्या घरातील संपूर्ण बियाणे पेरणी केली. सोयाबीनच्या एका बॅगची किंमत चार हजारांच्या वर गेल्यामुळे एवढी किंमत देऊनसुद्धा योग्य बियाणे मिळण्याची कोणतीही हमी नसल्यामुळे शेतकरी वैतागून गेला आहे. पेरणीकरिता उधार-उसनवारी, त्याचप्रमाणे कर्ज घेऊन केलेली पेरणी उलटत असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे़
शासनाने मदत करावी
दुबार पेरणी करताना शेतकऱ्याला शासनाने मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. काही लोकांनी आपल्या शेतामधील विहिरींमधील पाणी शेतीला देऊन सुरुवात केली; परंतु पाणी देऊन किती क्षेत्रावर सिंचन हाेईल असा प्रश्न आहे. बहुतांश भाग कोरडवाहू असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
पीक कर्ज वाटपही संथ गतीने
काेरोनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळेल, अशी अपेक्षा हाेती. मात्र, बँकांकडून पीक कर्जाचे वाटप संथ गतीने हाेत असल्याचे चित्र आहे. सिंदखेड राजा तालुक्यामधील जवळपास ७० टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. हवामान खात्याने चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे. मात्र, पावसाअभावी या पेरण्या उलटल्याची शक्यता निर्माण झाली आहे.