बुलडाणा : शहरातील विश्राम भवनसमोर दलाल ले-आऊटच्या प्रांगणात पावसाचे पाणी माेठ्या प्रमाणात साचले आहे़ या पाण्यात डासांची उत्पत्ती हाेत असल्याने परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त हाेत आहे़ त्यामुळे, नगरपालिकेने तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी १४ सप्टेंबर राेजी केली आहे.
शहरातील विश्राम भवनसमाेर असलेल्या खुल्या मैदानात पावसाचे पाणी माेठ्या प्रमाणात साचले आहे़ या मैदानाला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहेत़ साचलेल्या या पाण्यामुळे नागरिकांचे आराेग्य धाेक्यात आले आहे़ या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याने याला लोकांनी डेंग्यू तलाव नाव दिले आहे. आयडीबीआय बँक आणि विश्राम भवन या दोन्हीमध्ये मोठे मैदान आहे. या मैदानाभोवती दाट लोकवस्ती आहे. या मैदानात पावसाचे पाणी साचून राहते. हे पाणी जाण्यासाठी कुठेच जागा नाही. फार पूर्वी या पाण्यासाठी पाईप होता. मात्र ही पाईपलाईन गेल्या अनेक वर्षांपासून बुजलेली आहे. त्यामुळे या मैदानात तलावच तयार झालेला आहे़ अनेक दिवसांपासून साचलेल्या या पाण्यातून दुर्गंधी येत आहे़ या पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष
विश्राम भवनसमाेर असलेल्या मैदानात गत अनेक महिन्यांपासून पावसाचे पाणी साचलेले आहे़ या मैदानाला तलावाचे स्वरूप आलेले आहे़ याकडे परिसरातील लाेकप्रतिनिधींसह नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे़ या परिसरात डेंग्यू, मलेरियाची साथ पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे़ त्यामुळे, तातडीने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़