- संतोष येलकर लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा : अख्ख्या महाराष्ट्राची अस्मिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या जन्मस्थळाचा विकासच्या अनुषंगोने ३११ कोटी रुपयांचा जिजाऊ जन्मस्थळ विकास आराखडा २०१६-१७ मध्ये शासनामार्फत मंजूर करण्यात आला. विकास आराखड्यात प्रस्तावित विविध विकासकामांसाठी मंजूर निधीपैकी ५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. या मतदारसंघाचे प्रतिनिधी म्हणून शिवसेनेचे डॉ.शशिकांत खेडेकर यांना सत्तेत राहूनही विकास आराखडयाचा पूर्ण निधी खेचून आणता आला नाही. याबाबत मतदारसंघातील नागरिकांमध्ये नाराजीचा सुर असल्याचे चित्र आहे. ‘लोकमत’ ने या मतदारसंघातील प्रश्नांचा वेध घेतला असता हे वास्तव समोर आले. विशेष म्हणजे मतदारसंघातील पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाचा प्रश्नही मार्गी लावण्यात गत पाच वर्षात आमदारांना अपयश आल्याचा आरोप जनतेमधून होत आहे.बुलडाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांचे जन्मस्थळ विकासाची काही कामे सुरू करण्यात आली. त्यापैकी काही कामे अर्धवट असून, बहुतांश विकास कामे अद्याप प्रलंबित आहेत.सुरू असलेली कामेदेखिल निधीअभावी गत दोन महिन्यांपासून बंद पडली आहेत. राजमाता जिजाऊ साहेब जन्मस्थळ विकास आराखडा मंजुरीसाठी सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे विद्ममान आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी पुढाकार घेतला; मात्र विकास आराखडा मंजुरीनंतर प्रलंबित असलेला निधी आणि जिजाऊ जन्मस्थळाची विकास कामे पूर्ण करण्यासाठी आ. डॉ. खेडेकर यांचा पाठपुरावा कमी पडल्याने, विकासकामांसाठी २६१ कोटी रुपयांचा निधी अद्याप प्रलंबित असून, सुरू असलेली विकासकामेही रखडली आहेत. सिंदखेडराजा मतदार संघात नागरिकांना पिण्याचे पाणी आणि शेतीच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्यातही विद्ममान आमदारांना गत पाच वर्षात अपयश आले. दरम्यान, या संदर्भात आमदार खेडेकर यांच्यासोबत वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
राजे लखुजीराव जाधव राजवाडा जतन-दुरुस्तीचे काम रखडले!मातृतीर्थ सिंदखेड राजा येथील राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊ यांचे जन्मस्थळ आहे. राजवाडा जतन -दुरुस्तीचे सुरू करण्यात आलेले कामदेखील गत दोन महिन्यांपासून रखडले आहे. राजवाडा परिसरात रस्त्यावर चिखल होत असून, या समस्येचे निवारण आणि विकासकामे मार्गी लावण्याकडेही सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाच्या विद्ममान आमदारांचे दुर्लक्ष होत आहे.
धरण उशाला; कोरड घशाला!सिंदखेडराजा मतदारसंघातील देऊळगावराजा तालुक्यात खडकपूर्णा धरण असले तरी; या धरणातून मतदारसंघात पिण्याचे पाणी व शेतीच्या सिंचनासाठी पाणी वितरणाचे योग्य नियोजन करण्यासाठी गत पाच वर्षात या मतदारसंघाचे आ. शशिकांत खेडकर यांचा पाठपुरावा कमी पडला. त्यामुळे धरण असूनही, सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळत नाही. त्यानुषंगाने ‘धरण उशाला; कोरड घशाला’असाच प्रत्यय मतदारसंघातील नागरिकांना येत आहे.
- १२ जानेवारी २०१५ रोजी मुख्यमंत्र्यांनी सिंदखेड राजा विकास आराखड्याची घोषणा केली.
- तत्कालीन पालकमंत्री एकनाथ खडसे यांनी यांच्या अध्यक्षतेखाली २८ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विकास आराखड्यास मान्यता.
- ३ जानेवारी २०१६ रोजी प्रथम टप्प्यातील २५ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता.
- गेल्या तीन वर्षात विकास आराखड्याची गाडी रखडलेलीच आहे.
प्रशासकीय तांत्रिक अडचणीमुळे निधी उपलब्ध होऊ शकला नाही. अडचणी सोडविल्या. लवकरच निधी मिळणार आहे.-डॉ.शशिकांत खेडेकर, आमदार, सिंदखेडराजा