नीलेश जोशी, बुलढाणा: लोणार तालुक्यातील पिंप्री खंदारे या छोट्याश्या गावातील राजू केंद्रेची जर्मन सरकारच्या जर्मन चॅन्सलर फेलोशीपसाठी निवड झाली आहे. ही फेलोशीप जर्मन सरकारच्या संशोधन क्षेत्रातील जगमान्यता प्राप्त आलेक्सांदर हुंबोल्ट फाऊंडेशनद्वारे दिली जाते. १९५३ पासून कार्यरत असलेल्या या जगप्रसिद्ध फौंडेशनचे फेलो अल्बर्ट आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग शिवाय ६१ विविध क्षेत्रातील नोबेल विजेते राहिलेले आहेत. त्यामुळेचं विदर्भातील भटक्या समाजातील शेतकरी कुटुंबातील राजू केंद्रे यांची या प्रतिष्ठित फेलोशीपसाठीची निवड एक गौरवास्पद बाब ठरली आहे.
राजू केंद्रे जर्मन चॅन्सलर फेलोशिपच्या माध्यमातून जर्मनी व भारतातील उच्च शिक्षणाचा तुलनात्मक अभ्यास, उच्च शिक्षणातील असमानता व त्यावरचे धोरणात्मक बदल ह्या विषयात संशोधन व कार्य करणार आहेत. जर्मनीसोबतचं युरोपातील विद्यापीठे प्रत्यक्षपणे समजून घेत तेथील धोरणे, संशोधन क्षेत्र, व वंचित समुदायाचा मुख्य प्रवाहात समावेश, यासंदर्भाने त्यांचा अभ्यास हा भविष्यकाळात भारतातील शिक्षण क्षेत्रात व वंचित समुदायांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. फेलोशीपच्या माध्यमातून ते दीड वर्ष जर्मनीमध्ये बोन, बर्लिन शहरात व युनिव्हर्सिटी ऑफ गॉटिंगन विद्यापीठात मॉडर्न इंडिया सेंटर सोबत काम करणार आहेत.
मेळघाटातील मुलांना शिक्षणाच्या केंद्रस्थानी आणण्याचा प्रयत्न
राजू केंद्रे यांनी एकलव्य फाऊंडेशनच्या माध्यमातून मेळघाटमधील मुलांना उच्चशिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्राधान्य दिले आहे. २०१७ मध्ये या फाऊंडेशनची त्यांनी स्थापना केली होती. आदीवासी विद्यार्थ्यांचे गळतीचे प्रमाण अधिक असते. त्यावर त्यांचे कार्य सुरू आहे. ‘द रोड नॉट टेकन’ ही रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता राजू केंद्रे यांच्या आवडीची आहे.