लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खा. राजू शेट्टी व वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर यांना मध्य प्रदेशमधील पिंपलीया मंडी येथे अटक करण्यात आल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान मोरे, नितीन राजपूत यांच्या नेतृत्वात ७ जुलै रोजी कार्यकर्ते व महिलांनी एकत्र येऊन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा पुतळा जाळून या अटकेचा निषेध केला.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी, ना. रविकांत तुपकर यांच्यासह विविध संघटनेचे सर्व नेते एकत्र घेऊन खा.शेट्टी यांच्या नेतृत्वात मध्य प्रदेश येथील मैदसोर जिल्ह्यातील बुढा गावात आंदोलनात लाठ्या खाऊन शहीद झालेल्या शेतकऱ्यांचा अस्थीकलश घेऊन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, स्वामिनाथन आयोग लागू करावा आदी विविध मागण्या घेऊन किसान मुक्ती यात्रेला सुरुवात करण्यात आली. ही यात्रा महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, ओडिसा, हरियाणा, राजस्थान येथील शेतकरी नेते एकत्र घेऊन काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून एकत्र घेऊन दिल्ली येथे आंदोलन उभारण्यात येणार असल्याने व यात्रेचा वाढता प्रतिसाद पाहता, हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आज यात्रेचा प्रारंभ होताच मध्य प्रदेशातील पिंपलगाव मंडी येथे पोलिसांनी खासदार राजू शेट्टी, ना. रविकांत तुपकर यांच्यासह महाराष्ट्रातील कार्यकर्ते व इतर नेत्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रभर या घटनेचा निषेध करण्यात आला असून, चिखली येथे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवान मोरे, जिल्हा सरचिटणीस नितीन राजपूत, दीपक सुरडकर, विलास तायडे, अनिल चौहान, अनिल वाकोडे, भरत जोगदंडे, प्रशांत जैवाळ यांच्यासह कार्यकर्ते व शेकडो महिलाही सहभागी झाल्या होत्या. बुलडाण्यातही मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेधबुलडाणा : खा. राजु शेट्टी यांनी देशभर शेतकऱ्यांची किसान यात्रा काढलेली आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नावर देशातील शेतकरी या यात्रेमध्ये सामील झाले आहेत. मध्य प्रदेश येथून यात्रेला सुरुवात झाली होती; परंतु मध्य प्रदेश सरकारने ही यात्रा अडवून, खासदार राजू शेट्टी, ना. रविकांत तुपकर यांना अटक केली. यासंदर्भात ६ जुलै रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंदन यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मध्य प्रदेश सरकारचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळाला पाहिजे, यासाठी या मागण्या घेऊन खासदार राजू शेट्टी, रविकांत तुपकर यांनी ही यात्रा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढली होती; परंतु मध्य प्रदेश सरकार शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. यासाठी मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना व नेत्यांना अटक केली. यासाठी महाराष्ट्रभर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मध्य प्रदेश सरकारचा ठिकठिकाणी निषेध केला आहे. म्हणून मध्य प्रदेश सरकारने शेतकऱ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नये; अन्यथा देशभर शेतकऱ्यांचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा स्वाभिमानीने मध्य प्रदेश सरकारला दिला आहे. यावेळी या आंदोलनामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
राजू शेट्टी, तुपकरांच्या अटकेचा चिखलीत निषेध
By admin | Published: July 08, 2017 1:09 AM