बुलडाणा, दि. २१- जिल्ह्यातील मातंग समाजाचा सर्व्हे करून त्याला सरसकट दारिद्रय़ रेषेखालील गणन्यात यावे, कुडाची घरे असलेल्या समाज बांधवांना घरकुल योजना मंजूर करण्यात यावी आदी मागण्यांसाठी मातंग समाजाच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला.बेरोजगार युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना विविध बँकांमधून कर्जाचे वाटप करण्यात यावे, सुपडे, टोपल्याचा व्यवसाय करणार्यांना व बॅन्ड वादकांसाठी महामंडळाचा १0 टक्के निधी राखून ठेवण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी विदर्भ-खान्देश मातंग सेवा संघाच्यावतीने २१ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.स्थानिक जयस्तंभ चौकातील गांधी भवन येथून निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व मातंग सेवा संघाचे संस्थापक संघटक राजू मानकर यांनी केले होते. हा मोर्चा गांधी भवन, स्टेट बँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चादरम्यान कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळ दलालमुक्त झाले पाहिजे, अशा विविध घोषणा देऊन शहर दणाणून सोडले होते.
मातंग समाजाचा मागण्यांसाठी मोर्चा
By admin | Published: October 22, 2016 2:33 AM