लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : वडाळी व माळेगाव येथे सुरु असलेली अवैध दारु विक्री बंद करावी, यासाठी रणरागिणी सरसावल्या असून दारुबंदीसाठी महिलांनी उपविभागीय पोलिस अधिकारी मेहकर यांना १७ जुलै रोजी निवेदन देवून दारुबंदी न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या नियमानुसार दारुबंदी केलेली आहे. परंतु न्यायालयाच्या या आदेशाला मुठमाती देत जानेफळ पोलिस स्टेशन अंतर्गत प्रत्येक खेडेगावामध्ये अवैध दारुची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. वडाळी व माळेगाव येथे सुरु असलेली अवैध दारू विक्री होत आहे. दारुमुळे गोरगरीबांचे संसार उध्वस्त होत आहेत. तर न्यायालयाच्या आदेशानुसार सध्या सर्वत्र दारुबंदी असली तरी जानेफळचे ठाणेदार राहुल मोरे यांच्या नियोजनबद्ध पद्धतीने व आशिर्वादाने जानेफळ परिसरात अनेक खेडे गावामध्ये अवैध दारु विक्री व गावरान दारुच्या भट्टया मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. संबंधीत गावचे बिट जमादार सुद्धा या अवैध दारु विक्रीला जबाबदार दिसून येत आहेत. वरली, मटका, अवैध दारु विक्री सह इतर अवैध धंद्यांना आळा बसावा हे पोलिसांचे कर्तव्य आहे. कोणतीही तक्रार न येता पोलिसांनी स्वत:हून असे अवैध धंदे बंद करायला पाहिजे. मात्र पोलिसांच्या आशिर्वादानेच माळेगाव येथे अवैध दारु व गावरान दारुच्या भट्टया मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचा आरोप करून दारुभट्टया व अवैध दारु विक्री तात्काळ बंद कराव्यात अन्यथा जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महिलांनी दिला .
संपूर्ण दारुबंदीसाठी रणरागिणी सरसावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 12:33 AM