- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : ज्ञानगंगा अभयारण्यात रानतुळस वनस्पती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वनस्पतीच्या परिघात किटक, फूलपाखरू, मधमाशी तसेच प्राणी येत नसून गवताळ भाग कमी होत आहे. झपाट्याने वाढत असलेल्या रानतुळसमुळे वन्यजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.बुलडाणा जिल्ह्यात असलेले ज्ञानगंगा अभयारण्य २०५ हेक्टरमध्ये पसरले आहे. या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, तडस, हरिण, नीलगाय, सांबर, कोल्हा, लांडगा, माकड, खवले मांजर, ससा, जंगली कुत्रे, सायाळ यासह विविध प्राणी आढळतात. या जंगलात सागवान, अंजन, आवळा, गोंदण, खैर, टेंभुर्णी, हिवर, कळस, काळशिवर यासह विविध वृक्ष आहेत. या जंगलात मोठ्या प्रमाणात गवत आहे. जवळपास दोन ते फूट उंच गवत या जंगलात आढळते. त्यामुळे तृणभक्षी प्राण्यांची संख्याही अधिक आहे. या जंगलात गत काही वर्षांपासून रानतुळस वनस्पतीचा प्रादुर्भाव वाढत आहे. अत्यंत झपाट्याने ही वनस्पती वाढत आहे. रानतुळस वनस्पतीची दुगंर्धी येते. या वनस्पतीलगत कोणतेही गवत व वृक्ष वाढत नाही. तसेच किटक, फूलपाखरू, मधमाशी, भिंगोटेही या वनस्पतीवर बसत नाही. किंवा या वनस्पतीच्या आसपास भटकतही नाही. पूर्वी या जंगलात गवत मोठ्या प्रमाणात होते. मात्र आता रानतुळस वाढत असल्याने गवत कमी होत आहे. दिवसेंदिवस या वनस्पतीचे क्षेत्र वाढत आहे. रानतुळस असलेल्या भागात हरिण, रोही किंवा अन्य तृणभक्षी प्राणीही फिरकत नाहीत. यामुळे हरिण, रोही, सांबर या प्राण्यांचे खाद्यच कमी होत असल्याने हे प्राणी जंगत सोडून आजूबाजूच्या शेतातील पिकांकडे वळत आहे.वन्यजीवांचा अधिवास संकटातअत्यंत वैभवसंपन्न जैवविविधता असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात रानतुळस वाढतच आहे. या रातुळसच्या जवळपास वृक्ष, किटक, प्राणी असा कोणताही सजिव आढळत नाही. वनस्पतीला बिज मोठ्या प्रमाणात येत असून, एक झाड दुसऱ्या वर्षी आजूबाजूच्या परिसरात पसरते. त्यामुळे हळूहळू वन्यजीवांचा अधिवास संकटात येत आहे.
रानतुळस निर्मुलन रखडलेवनविभागाच्यावतीने काही वर्षांपूर्वी रानतुळसचे निर्मुलन करण्यात येणार होते. मात्र काही कारणास्तव रानतुळसचे निर्मुलन रखडले आहे. मात्र ही वनस्पती झपाट्याने वाढत असल्याने गवताळ भाग कमी होत आहे.