मेहकर : शहरात शनिवारी रॅपिड चाचणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोराेनावर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून हे शिबिर घेण्यात येणार आहे. याकरिता शहरात विविध ठिकाणी कोरोना चाचणी बूथ लावण्यात येणार आहेत.
शहरात गेल्या काही दिवसापासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी युद्धस्तरावर उपाययोजना करण्याकरिता तहसील कार्यालय, ग्रामीण रुग्णालय, नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना रॅपिड चाचणी शिबिराचे आयोजन १० एप्रिल रोजी करण्यात आले आहे. सकाळी ०९ ते दुपारी ०३ या वेळेत हे शिबिर सुरू राहणार आहे. शहरातील प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी समजून कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा रुग्ण कल्याण समिती सदस्य सागर कडभने यांनी केले आहे. मेहकर शहरात बसस्थानक, राममंदिर, इकबाल चौक, मिलिंदनगर, आठवडी बाजार, नगर परिषद, कॉटन मार्केट, गजानन हॉस्पिटल, मिताली हॉस्पिटल, पोलीस स्टेशन या ठिकाणी कोरोना चाचणी बूथ उभारण्यात येणार आहेत. नागरिकांनी या ठिकाणी जाऊन आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.