बुलडाणा : मागील पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात थंडीची लाट पसरली आहे. तापमानाचा पारा ८ अंशावर येऊन ठेपल्यामुळे जिल्ह्याला हुडहुडी भरली असताना बुधवारी पहाटे व दिवसभर जिल्ह्याच्या काही भागात पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वार्यासह, तर संग्रामपूर, नांदुरा तालुक्यासह काही भागात तुरळक गाराही पडल्याने थंडीचा कहर जिल्ह्यात कायम आहे. शिवाय अचानक आलेल्या या पावसामुळे रब्बीच्या हरभरा, गहू आणि भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्याचे तापमान ८ अंश सेल्सियसवर आले. त्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कहर झाला आहे. बरोबर असलेल्या ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकांवर किडीचा प्रदुर्भाव झाला. या वातावरणात कडाड्याच्या थंडीबरोबरच बुधवारी पहाटे चार वाजता परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. सकाळी झालेला हा पाऊस सर्वदूर झाला. त्यानंतर बुधवारी दिवसभर जिह्यात ठिकठिकाणी या पावसाने हजेरी लावली. देऊळगावराजा, सिंदखेडराजा शहर व परिसरात पाऊस झाला. देऊळगावमही येथे तब्बल दोन तास वादळी वार्यासह पाऊस झाला. काही भागात तुरळक स्वरूपाच्या गाराही पडल्याची माहिती आहे. रुईखेड मायंबा, धाड, चांडोळ, डोमरूळ या परिसरातही पाऊस झाल्याने शेतकर्यांच्या पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. संग्रामपूर पावसाबरोबर गारा पडल्या आहेत. यामुळे रब्बी पिकाची नासाडी झाल्यामुळे शेतकर्यांना आर्थिक फटका बसला आहे. *चांडोळ येथे गारांचा पाऊस मंगळवारी ३0 डिसेंबर सायंकाळपासूनच आकाशात ढग जमा होऊन दुसर्या दिवशी मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. तर बुधवारी सायंकाळी या परिसरात अर्धा तास पाऊस झाला. या पावसाबरोबर हरभर्याएवढय़ा गाराही पडल्या. वादळी वारा, पाऊस आणि गारा पडल्याने शेतातील हरभरा, गहू आणि कांदा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले. या आवकाळी पावसाने शेतकर्यांची एकच तारांबळ उडाली होती. अनेक शेतकर्यांच्या शेतात अद्याप सोयाबीनच्या सुड्या आहेत. बुधवारी सकाळी झालेल्या पावसाने काही शेतकर्यांचे सोयाबीनसुद्धा भिजल्याचे वृत्त आहे.
अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान
By admin | Published: January 01, 2015 12:39 AM