लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या नऊ टक्के वनसंपदा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील जैवविविधता समृद्ध असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. बुलडाणा शहरापासून अवघ्या दहा ते १२ किमी अंतरावर असलेल्या दहीद बुद्रूक गावात रात्री दुर्मिळ खवल्या मांजर आढळून आल्याने या जैविविधतेवर एक प्रकारे शिक्का मोर्तबच झाले आहे.दहीद बुद्रूक गावात शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास एक विचित्र दिसणारा प्राणी आल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहले. त्यामुळे काही नागरिकही भयभीत झाले होते. मात्र नतंर हा प्राणी दुसरा तिसरा कोणी नसून दुर्मिळ झालेले खवल्या मांजर असल्याचे स्पष्ट झाले. दहीद बुद्रूक येथील मुख्य शाळेच्या समोरच असलेल्या झाडीतून हे दुर्मिळ खवल्या मांजर समोर आले तेव्हा त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी व लहान मुलांनी येथे गर्दी केली होती.दरम्यान, हे खवल्या मांजर दुर्मिळ असून त्याचे महत्त्व लक्षात येताच गावातील देवकर नामक व्यक्तीने त्वरित बुलडाणा वनविभागाला याची माहिती दिली. दुर्मिळ सस्तन प्राणी आणि तोही शेड्यूल वनमधील असल्यामुळे वनविभागाने त्वरित हालचाल केली व बुलडाणा वनविभागाची एक रेस्क्यू टीम दहीद बुद्रूक गावात शुक्रवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास पाठवली. रेस्क्यू टिमचे सदस्य असलेले संदीप मडावी आणि समाधान मान्टे यांनी गावातील मुख्य शाळेच्या परिसरात असलेले हे खवल्या मांजर ग्रामस्थांच्या मदतीने पकडले व त्याला बुलडाणा येथील जिल्हा उपवनसंरक्षक कार्यालयात रात्री दहाच्या सुमारास आणण्यात आले. तेथे त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यास जिल्हा उपवनसंरक्षक संजय माळी यांच्या निर्देशानुसार अस्वलांसाठी प्रसिद्ध असलेल्या ज्ञानगंगा अभयारण्यात रात्रीच सोडण्यात आले. खवल्या मांजर हे एक दुर्मिळ प्रजातीमधील प्राणी आहे. बुलडाणा जिल्ह्यातही प्रदीर्घ कालावधींतर हे खवल्या मांजर आढळून आले आहे. १९७२ च्या वन्य जीव अधिनियमानुसार या प्राण्याला संरक्षण देण्यात आले आहे. मुंग्या व उधई त्याचे प्रमुख अन्न असून लांब जिभेद्वारे ते तो खातो.
दहीद बुद्रूक मध्ये आढळले दुर्मिळ खवल्या मांजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2020 4:06 PM