ब्रम्हानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देणाºया राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील विचारांची शिदोरी आजच्या आधुनिक काळातही जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या माध्यमातून राज्यभर होत आहे. राज्यात राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या ५० शाखांमधून तुकडोजी महाराजांनी दिलेली मानवतेची शिकवण देण्याचे कार्य केले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबरला महाराजांना श्रद्धांजली अर्पण करून ‘मानवता दिन’ साजरा करण्यात येत आहे. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ माननारे आधुनिक काळातील महान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भजन आणि कीर्तनाच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनाचे कार्य केले. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी १९३५ साली अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हाती घेवून जगाला मानवतेची व सर्वधर्म समभावाची शिकवण देण्याचे कार्य त्यांनी केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या संकल्पनेतून खास तत्वज्ञानाचा प्रसार व्हावा, म्हणून राष्ट्रसंत अध्यात्म केंद्र तयार करण्यात आले. या केंद्रातर्गत तुकडोजी महाराजांचे विचार आजच्या आधुनिक काळाज राज्याच्या कानाकोपºयात पोहचविण्यासाठी राष्ट्रधर्म प्रचार समिती कार्य करत आहे. आचार्य वेरूळकर गुरूजी आजीवन प्रचारक तर अखिल भारतीय गुरूदेव सेवा मंडळ हे तर कमिटीचे संचालक अध्यक्ष माधवराव सूर्यवंशी आहेत. तसेच कार्याध्यक्ष म्हणून डॉ.नरेंद्र तराळ हे काम पाहतात. राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यभरात ५० शाखांची स्थापना करण्यात आली आहे. सध्या विदर्भात ४०, मराठवाडा पाच व पश्चिम महाराष्ट्रात पाच अशा एकूण ५० शाखांमधून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे अखंड कार्य सध्या सुरू आहे. अखिल भारतीय श्रीगुरूदेव मंडळाच्यावतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त १० आॅक्टोबर रोजी श्रद्धांतली अर्पण करून मानवता दिन पाळण्यात येत आहे. त्यानिमित्त राष्ट्रधर्म प्रचार समितीकडून विविध ठिकाणी प्रबोधनपर कार्यक्रम घेण्यात येत आहेत.
दिवाळी सुट्टीमध्ये होते संस्कार शिबीरराष्ट्रधर्म प्रचार समितीच्या राज्यात असलेल्या ५० शाखांतर्गत दिवाळी व उन्हाळी सुट्टीमध्ये संस्कार शिबीर घेण्यात येते. तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये मानवतेला केंद्रभूत ठेवून लिहिलेले विचार मुलांमध्ये रूजविण्यासाठी यावर्षी सुद्धा दिवाळी सुट्टीत राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या शाखांकडून संस्कार शिबीरांचे आयोजन करण्यात येणार आहे.
राष्ट्रधर्म प्रचार समितीच्या सर्व शाखांमधून तुकडोजी महाराजांचे विचार सर्वत्र पोहचविण्याचे कार्य करण्यात येते. प्रामाणिक व सत्वशील समाजाच्या निर्मितीसाठी हे कार्य अखंड सुरू आहे. - प्रशांत ठाकरे, राष्ट्रधर्म प्रचार समिती प्रवक्ता.