लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : तालुक्यातील पिंपळगाव येथे पकडण्यात आलेले रेशन धान्याचे वाहन कोणत्याही कारवाईविना सोडून देण्यात आले. यासाठी मोठ्याप्रमाणात अर्थपूर्ण व्यवहाराची चर्चा असतानाच, गुरूवारी वरवट बकाल येथे भर रस्त्यावर एका वाहनातून दुसºया वाहनात धान्याची ‘क्राँसिंग’ करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनीच सारवासारव सुरू केली आहे. त्यामुळे रेशनच्या धान्याच्या काळ्याबाजाराला पोलिसांचे पाठबळ असल्याची जोरदार चर्चा होतेय.
जिल्ह्यातील रेशन धान्य काळ्याबाजाराची लक्तरे मंत्रालय स्तरावर पोहोचली आहेत. तांदूळ आणि गव्हाच्या अफरातफर प्रकरणी विविध चौकशी प्रलंबित आहेत. धान्याच्या काळ्याबाजारास धान्य वाहतूक कंत्राटदार, पुरवठा विभागातील कर्मचारी आणि काही धान्य दुकानदारांचाही सहभाग असल्याची अनेक प्रकरण समोर आली आहेत. गेल्यावर्षी आॅगस्ट २०१७ मध्ये खामगाव येथे ६० टनापेक्षा जास्त रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला. यापैकी २० टन तांदूळ खामगाव येथील शासकीय गोदामात जमा करण्यात आला. त्यानंतर खामगाव येथेच मार्च २०१८ मध्ये रेशनच्या गहू अफरातफरीच्या घोळाचा भंडाफोड झाला. जिल्ह्यातील शेगाव तालुक्यासोबतच मेहकर आणि चिखली तालुक्यातही रेशन माल वाहतुकीचे विविध घोळ समोर आले. दरम्यान, खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये रेशन धान्य वाहतूक करणाºया मिनीट्रक प्रकरणी कारवाईचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. पोलिसांनी पकडलेले वाहन अर्थपूर्ण व्यवहारातून सोडून दिल्याची जोरदार चर्चा परिसरात होत आहे. या वाहनात रेशन धान्य नव्हे तर सोयाबीन असल्याचा दावा पोलिसांकडून केल्या जात आहे. याप्रकरणी वरिष्ठ स्तरावरून पिंपळगाव राजा पोलिसांची कानउघडणीही करण्यात येत आहे. त्याचवेळी गुरूवारी रात्री अंधाराचा फायदा घेत रात्री ९ वाजेदरम्यान, दोन मालवाहू मिनीट्रकमधून सोनाळा-वरवट रस्त्यावर रेशनच्या धान्याची क्रॉसींग (एका वाहनातून दुसºया वाहनात धान्य वाहून नेणे) करण्यात आली. वरवट बकाल पासून एका पेट्रोलपंपासमोर हा प्रकार घडला. त्यामुळे रेशन धान्याची वाहतूक करणारा एक मोठा ट्रकही याठिकाणी संशयास्पदरित्या उभा होता. हा धक्कादायक प्रकार तामगाव पोलिस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर सुरू होता. मात्र, तामगाव पोलिसांकडून याकडे हेतूपुरस्परणे दुर्लक्ष करण्यात आल्याने, जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत ही तक्रार पोहोचली. त्यानंतर नाईलाजाने तामगाव पोलिस घटनास्थळी पोहोचले. मात्र, तोपर्यंत क्रॉसींग करणाºया दोन वाहनांसोबतच एक मोठे वाहनही घटनास्थळावरून निघून गेले. हे येथे उल्लेखनिय!
दोन वाहनातील धान्य एका वाहनात!
तीन वाहनांमधील धान्य चक्क वाहनात टाकण्यात आले. त्यानंतर दोन वाहने वेगळ्या दिशेने तर एक वाहन वेगळ्या दिशेने निघून गेले. एमएम ०४ ७६२६ या वाहनातून एमएच ०४ बीयु ९९७६ या वाहनांत धान्या टाकण्यात आले. त्यावेळी एक मोठा ट्रक वरवटच्या दिशेने रिकामा उभा होता. धान्य वाहून नेणारा मिनीट्रक ठराविक ठिकाणी न पोहोचला लांबच्या मार्गाने विलंबाने पोहोचला. त्यामुळे या वाहनातून वाहून नेणाºया मालाच्या काळ्याबाजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
रेशन धान्य वाहतूक करणारा एक मिनीट्रक नादुरूस्त झाल्याने दुसºया वाहनांत धान्य टाकण्यात आले. याबाबत सविस्तर चौकशी करण्यात आली. अफरातफरीचा आणि काळ्याबाजाराचा कोणताही प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनीचे दिसून येत नाही.
- दिंगबर इंगळे, पोलिस निरिक्षक, तामगाव. ता.संग्रामपूर
पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये लावण्यात आलेल्या वाहनांबाबत जाणिवपूर्वक सांशकता निर्माण केली जात आहे. रेशन धान्याचे कोणतेही वाहन पिंपळराजा पोलिसांनी सोडलेले नाही. अर्थपूर्ण व्यवहाराचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे.
-निखिल फटींग, पोलिस निरिक्षक, पिंपळगाव राजा, ता. खामगाव.
एक वाहन साडेपाच वाजता निघाल्यानंतर नांदुरूस्त झाल्याचा निरोप मिळाला. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर एका वाहनातून दुसºया वाहनात धान्य टाकण्यात येत होते. मात्र, तिसºया वाहनासंदर्भात आपणाला कोणतीही माहिती नाही.
- भूषण अहीरे, तहसीलदार, संग्रामपूर