बुलडाणा : सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत आता बुलडाणा जिल्ह्यातील एक हजार ५३८ रास्त भाव दुकानामध्ये एईपीडीएस प्रणाली (आधार अॅनेबल पब्लिक डिस्ट्रिब्युशन सिस्टीम) महाराष्ट्र दिनापासून कार्यान्वित होत आहे. शिधापत्रिकाधारकांना पोर्टेबिलिटीचा अधिकार मिळाल्यामुळे महिन्यातून कोणत्याही दुकानातून एकदा त्यांना धान्य घेणे सोपे झाले आहे.दरम्यान, बुलडाणा जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांच्या आधारकार्डचा डाटा ९४ टक्के संगणकीकृत झाल्याने बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी, मध्यंतरी धान्य घोटाळ्यामुळे चर्चेत आलेल्या पुरवठा विभागाच्या कारभारात अधिक पारदर्शकता येण्यास मदत होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. बुलडाणा जिल्ह्यातील दीड हजार रेशन दुकानांमध्ये यापूर्वीच ई-पॉस मशीन बसविण्यात आलेले आहेत; मात्र प्रसंगी हाताचे ठसे मॅच न झाल्यास माणूस प्रत्यक्ष ओळखीचा असल्याने त्याला रेशन दुकानदारही धान्य देत होते; मात्र आता ई-पॉस मशीनवर हाताचे ठसे प्रत्यक्षात जुळल्याशिवाय शिधापत्रिकाधारकाला धान्य उपलब्ध होणार नाही. त्यानुषंगाने एईपीडीएस ही प्रणाली महत्त्वपूर्ण आहे. कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांत याची अंमलबजावणी यापूर्वीच सुरू झाली आहे. आता बुलडाणा जिल्ह्यात ती लागू होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील ४ लाख ४७ हजार १४० पात्र शिधापत्रिकाधारकांना अंगठ्याच्या ठशाची ओळख पटवून बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण केले जाणार आहे. बुलडाणा जिल्ह्यात अंत्योदय योजनेंतर्गत ६८ हजार १४७ कुटुंब, प्राधान्य कुटुंब योजनेतील तीन लाख तीन हजार २९० कुटुंब, शेतकरी योजनेतील ७५ हजार ७०३ कुटुंबांचा समावेश आहे. दरम्यान, यापैकी ज्या लाभार्थीचे आधार सिडिंग शिधापत्रिकेसोबत करण्यात आले आहे, त्यांनाच धान्य वाटप करण्यात येईल.
९८ हजार मेट्रिक टन गव्हाचे वाटप!जिल्ह्यात एकूण ९७ हजार ७०० मेट्रिक टन गहू आणि २२ हजार ७६० मेट्रिक टन तांदूळ असे एकूण एक लाख २० हजार ४६० मेट्रिक टन अन्नधान्य, ६६४ क्विंटल साखर स्वस्त दराने ई-पॉस मशीनद्वारे वाटप करण्यात येत आहे. सोबतच चार हजार ६५४ क्विंटल तूर डाळीचे वाटपही शिधापत्रिकेवर होत आहे.
तीन हजार मेट्रिक टन साठवण क्षमता वाढली!बुलडाणा जिल्ह्यातील प्रलंबित असलेल्या देऊळगावराजा, लोणार आणि चिखली येथील एक हजार ८० मेट्रिक टन साठवण क्षमतेचे गोदामही पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे जिल्ह्याची धान्य साठवण क्षमता वाढली असून, पुरवठा विभागाची साठवण क्षमता वाढली आहे. जिल्ह्याची एकूण धान्य साठवण क्षमता आता तीन लाख ७७ हजार ४९९ मेट्रिक टनाच्या आसपास आहे.
धान्य दुकानदारांचा फायदापुरवठा विभागाने ९४ टक्के डाटा संगणकीकृत केल्याने एईपीडीएस प्रणाली कार्यान्वित झाली आहे. त्याचा फायदाही धान्य दुकानदारांना होणार आहे. शिधापत्रिकाधारक या प्रणालीमुळे कोणत्याही दुकानातून एकदा धान्य घेऊ शकतो. त्यामुळे स्वच्छ, पारदर्शी कारभार आणि सेवा देण्याची तत्परता याच्या निकषावर शिधापत्रिकाधारक चांगल्या दुकानाची निवड करू शकतो. त्यामुळे प्रतिक्विंटल दीडशे रुपये मार्जिन मिळणाºया दुकानदाराला याचा अधिक फायदा होण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली.