लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रेशन धान्य अफरातफरीप्रकरणी एका दुकानाची दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानास तात्पुरती जोडणी करताना, भेदभाव करण्यात आल्याचे दिसून येते. नजीकच्या दुकानदारांऐवजी दूरवरच्या आणि नियमात न बसणाऱ्या स्वस्त धान्य दुकानास जोडणी करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
खामगाव तालुक्यातील आवार येथील स्वस्त धान्य दुकानदार एल.एस.गवई यांनी उचल केलेल्या धान्याची अफरातफर केल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. त्यामुळे संबंधीत दुकानदाराचा स्वस्त धान्याचा परवाना कायम स्वरूपी रद्द करण्याची शिफारस वरिष्ठ स्तरावर करण्यात आली. तसेच शीधापत्रिका धारकांची अडचण लक्षात घेता, आवार येथील रास्त भाव दुकान तात्पुरते पोरज येथील रास्त भाव दुकानदाराला जोडण्यात आले. मात्र, ही जोडणी करताना भेदभाव करण्यात आल्याची ओरड होत आहे. त्यामुळे आवार येथील लाभार्थ्यांची अवस्था ‘आसमान से गिरे और खजूर मे लटके’ अशी झाल्याची चर्चा आहे. तथापि, राजकीय दबावातून या दुकानाची जोडणी झाल्याची चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
आवार येथेच धान्याचे वितरण
आवार येथील दुकानाची पोरज येथील दुकानाला जोडणी करताना संबंधित दुकानदाराला आवार येथेच धान्याचे वितरण करण्याचे निर्देश तहसीलदार खामगाव यांनी दिले आहेत. तथापि, नजीकचे दुकानदार सोडून पोरज येथील एका दुकानदारावरच प्रशासनाची विशेष मेहरबानी का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
रेशन धान्याच्या अफरातफर प्रकरणी आवार येथील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना निलंबित करण्यात आला. त्यानंतर तात्काळ उपाययोजना म्हणून दुसºया स्वस्त धान्य दुकानदारास जोडण्यात आले. जोडणी करताना सक्षम दुकानदार हाच एक निकष लावण्यात आला. दुकानाची जोडणी करताना कोणताही भेदभाव करण्यात आला नाही.
- सदाशिव वनमाने, पुरवठा निरिक्षक, खामगाव.