बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे ११ व १२ एप्रिल रोजी झालेल्या स्वाभीमानी शेतकरी संघटना व पक्षाच्या राज्य कार्यकारीणीच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा खुद्द खा. राजू शेट्टी यांनी केली. पुणे येथे दोन दिवस झालेल्या या बैठकीत आगामी काळाच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर विचारमंथन झाले. सोबतच २०१९ च्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान तुपकरांच्या नावाची घोषणा करून त्यांच्या खांद्यावर स्वाभीमानी शेतकरी संघटनाव पक्षाची धुरा आता देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीचे बुलडाण्यातही जल्लोषात स्वागत करण्यात आले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रविकांत तुपकर यांनी बुलडाणा जिल्ह्यात स्वाभीमानी शेतकरी संघटनेची मोट बांधली. बुलडाणा शहरालगतच्या सावळा या छोट्याश्या गावातून तरुणांना सोबतच घेऊन शेतकरी पुत्रांच्या हक्कासाठी तुपकरांनी लढा उभारला होता. ग्राम पातळीवरील पाणीटंचाई, शेतकर्यांच्या छोट्या-मोठ्या समस्या घेऊन त्यांनी शेतकर्यांना न्याय देण्यासाठी प्रशासनाविरोधात त्यांनी आक्रमक आंदोलने केली. दरम्यानच्या काळातच ते शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शरद जोशी यांच्या संपर्कात आला व संघटनेत काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध झाली. राजकीय पार्श्वभूमी नसताा त्यांनी प्रस्थापित राजकीय पक्ष व नेत्यांना शह देत त्यांनी शेतकर्यांच्या प्रश्नावर जिल्ह्यात लढा उभारला. शेतकर्यांच्या प्रश्नी स्वाभीमानी भाजपसोबत गेली. त्यावेळी रविकांत तुपकरांना अर्थात स्वाभीमानीला वस्त्रोद्योग महामंडळाच्या रुपाने पहिला लालदिवा दिला. मात्र नंतर शेतकर्यांच्या प्रश्नावरच स्वाभीमानीने भाजपशी काडीमोड घेतली. तेव्हा वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा तुपकरांनी दिल्याने ते राज्यात चर्चेत आले होते.
स्वाभीमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी रविकांत तुपकर; राजू शेट्टींनी केली घोषणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 6:34 PM
बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर यांची निवड करण्यात आली आहे.
ठळक मुद्देराज्य कार्यकारीणीच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा खुद्द खा. राजू शेट्टी यांनी केली. या निवडीचे बुलडाण्यातही जल्लोषात स्वागत करण्यात आले. वस्त्रोद्योग महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा तुपकरांनी दिल्याने ते राज्यात चर्चेत आले होते.