बुलडाणा: आगामी दीड महिना चार टप्प्यात गोवर, रुबेला लसीकरणाची मोहिम जिल्ह्यात राबविण्यात येत असून चार दिवसात २१ जणांना किरकोळ रिअॅक्शन आल्या असल्या तरी त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, गेल्या काळात देशातून देवी, पोलिओ आणि नारू आणि गर्भवती महिलांमधील धनुर्वाताचा आजार आज पूर्णत: हद्दपार करण्यात आल्यानंतर आता गोवर व रुबेला हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभागाने लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान, त्यातंर्गत इंजेक्शनद्वारे केल्या जाणारी ही लसिकरण मोहिम ही राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी मोहिम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. मिझल्स, रुबेला हा सात ते आठ दिवसात ठिक होत असला तरी त्यानंतर आजारी व्यक्तीमध्ये न्युमोनिया, मेंदुज्वर, कुपोषणासाबेतच अंधत्व तथा मेंदुचा आजार होण्याची शक्यता असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतागुंत होऊन रुग्ण दगावण्याचे प्रमाणही वाढते आहे. यासोबतच गर्भवती महिलांचा गर्भपात होणे किंवा जन्मणारे मुल हे जन्मत:च अपंगत्व, मतीमंद, कुपोषीत असणे किंवा अनुवंशीक रोग त्यास असणे, ह्रदयविकारही त्याला होऊ शकतात. त्यामुळे ते टाळण्यासाठी ही मोहिम हाती घेण्यात आली आहे. एकट्या भारतात दरवर्षी ५० हजार व्यक्तींचा या आजारामुळे मृत्यू होतो तर जागतिकस्तरावरील आकडेवीराचा विचार करता एक तृतियांश मृत्यू हे एकट्या भारतात होता. परिणामस्वरुप जागितक आरोग्य संघटनेच्या सुचनेनुसार ही व्यापक मोहिम हाती घेण्यात आली असून देशातील २१ राज्यातील दहा कोटी व्यक्तींना याचे लसिकरण करण्यात आले असून यामध्ये रिअॅक्शनमुळे एकही मृत्यू झालेला नाही. त्यामुळे रिअॅक्शनला घाबरून जाण्याचे कारण नसल्याचेही जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी स्पष्ट केले. नऊ महिने ते १५ वर्षाखालील मुलांना हे लसिकरण करण्यात येत आहे. बुलडाणा जिल्ह्यात तीन टप्प्यात ही मोहिम राबविण्यात येत असून पहिल्या दोन आठवड्यात शाळांमध्ये तर तिसर्या आठवड्यात अंगणवाडीमध्ये लसीकरण सत्र हाती घेण्यात आले तिसर्या टप्प्यात स्थलांतरीत झालेल्यांचा शोध घेऊन त्यांच्याकडील नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील मुला-मुलींना हे लसिकरण करण्यात येणार आहे.
रिअॅक्शनची स्थिती हाताळण्याचेही प्रशिक्षण
लसीकरणच नव्हे तर कुठल्याही औषधाने व्यक्तीला येऊ शकते. त्यास घाबरून जाण्याचे कारण नाही. लसिकरणादरम्यान एखाद्या विद्यार्थ्यास रिॅअॅक्शन आल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी प्रत्येक पथकासोबत इंजेक्शनसह औषधींचा पुरवठा केलेले आहे. यासंदर्भाने संबंधीत सर्व डॉक्टरांचेही प्रशिक्षण झालेले आहे. सोबतच संभाव्य साईडइफेक्ट टाळण्यासाठी जिल्ह्यातील २३ रुग्णवाहिका (१०८), प्राथमिक आरोग्य केंद्रावरील चालू स्थितीतील रुग्णवाहीका या लसीकरण सेंटरच्या जवळपास सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत. काही खासगी रुग्णवाहिकांचीही त्यासाठी मदत घेण्यात येत आहे. त्यासंदर्भातील मायक्रो प्लॉनच आरोग्य विभागाने केला असून जुलै २०१८ पासून यासंदर्भातील सविस्तर असे प्रशिक्षण डॉक्टरांना देण्यात आलेले आहे. रिअॅक्शनच्या स्थितीत कोनते डोस द्यावे याच्या सुचनाही जिल्ह्यात ही मोहिम राबविणार्या डॉक्टरांच्या पथकांना दिल्या असून एकमेव बुलडाणा जिल्ह्यात दोन वेळा आरोग्य यंत्रणा, शिक्षण विभागासह मोहिमेत सहभागी असणार्यांना प्रशिक्षीत केले गेले असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
३० टक्के लोकसंख्येला लसिकरण
व्यापकस्तरावरील ही लसिकरणाची मोहिम असून नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील सव्वासात लाख मुलांना हे लसिकरण करण्यात येणार आहे. बुलडाणा जिल्ह्याच्या जवळपास २८ लाखांच्या घरात असलेली लोकसंख्या पाहता त्याच्या एक तृतियांश एवढी ही संख्या आहे. त्यामुळे प्रत्येक पथकात असलेल्या चार सदस्यांद्वारे दररोज शहरी भागात २०० तर ग्रामीण भागात दीडशे मुलांचे लसिकरण करण्यात येत आहे. दरम्यान, जिल्हयात गेल्या चार दिवसात २१ जणांना रिअॅक्शन आली असली तरी गंभीर स्वरुपाची अशी (अॅनाफायलेक्सीस) एकाच विद्यार्थ्याला रिॅक्शन आली होती. त्याची प्रकृतीही सध्या चांगली आहे.
रिअॅक्शन टाळण्यासाठी ही घ्या काळजी
लसीकरणा अगोदर मुलांनी नास्त केलेला असावा, लसिकरणानंतर विद्यार्थी किमान दोन तास किंवा शाळा संपेपर्यंत शाळेतच रहावा जेणेकरून प्रसंगी काही अडचण आल्यास त्याला लगोलग उपचारासाठी नेता येईल आणि नागरिकांनी अफवांना बळी पडू नये, असे आवाहनही जिल्हा आरोग्य अधिकार्यांनी केले आहे. दरम्यान, चार दिवसात जिल्हयात ८० हजार विद्यार्थ्यांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. दहा लाख व्यक्तींमागे एखाद्यासह सिरीयर रिअॅक्शन येण्याचे प्रमाण आहे.