खामगाव (बुलडाणा): विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज मंगळवार ७ ऑ क्टोबर रोजी खामगाव येथे शासकीय तंत्रनिकेतनच्या भव्य मैदानावर दुपारी १.३0 वाजता जाहीर सभा होत आहे. या जाहीर सभेसाठी जय्यत तयारी झाली आहे. सुरक्षा यंत्रणेच्या सूचनेनुसार व्यासपीठ आणि अन्य सुविधांची आखणी करण्यात आली आहे. सभा होत असलेले मैदान २ ते अडीच लाख नागरिक बसू शकतील या आकाराचे म्हणजेच ६00 बाय ९00 आकाराचे ५ लाख ४0 हजार स्वेक्वर फूट आहे. पंतप्रधानांचे आगमन हेलिकॉप्टरने होणार असून, यासाठी गो.से. महाविद्यालयाच्या मैदानावर तीन तसेच अंजुमन हायस्कूलच्या मैदानावर एक असे चार हेलिपॅड बनविण्यात आले आहेत. तसेच पंतप्रधानांना हेलिपॅडवरून सभास्थळी येण्यासाठी गो.से. महाविद्यालयाच्या मैदानापासून सभास्थळापर्यंत स्वतंत्र रस्ता निर्माण करण्यात आला आहे. तसेच सभास्थळी वेगवेगळ्या डी झोनचे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे. खामगाव येथे प्रथमच पंत प्रधानांची जाहीर सभा होत असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळे डी झोन उभारण्यात आले असून, त्यानंतर मोदी यांच्यासाठी १२ बाय ८ या आकाराचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यतिरिक्त विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते आ. भाऊसाहेब फुंडकर, भाजपा व मित्रपक्षाचे जिल्ह्यातील उमेदवार अँड. आकाश फुंडकर, आ.डॉ. संजय कुटे, आ. चैनसुख संचेती, सुरेशआप्पा खबुतरे, डॉ. योगेंद्र गोडे, डॉ. गणेश मांटे, नरहरी गवई यांच्यासह एकूण २0 जण राहणार आहेत. तसेच व्यासपीठासमोरील दोन डी झोन सोडून त्यापुढील डी झोनमध्ये निमंत्रित ४ हजार व्हीआयपींची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या या सभेला लाखोच्या संख्येने गर्दी होणार असल्याने व शेकडो वाहने येण्याची शक्यता पाहता वाहनाच्या पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.
मोदींसाठी मैदान सज्ज
By admin | Published: October 06, 2014 11:55 PM