लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सल असली की अस्सल लिहीले जाते. मी सुचलं म्हणुन लिहीत नाही तर बोचलं म्हणुन लिहीतो. माय मराठीने जोंधळ्याच्या कणसात दाणे भरावेत इतकं भरभरून दिलं. कवी लिहीतो तो समाज जोडण्यासाठी , माणसाला माणसाशी जोडते ती खरी कविता असते असं मी माणतो, असे विचार मांडले ख्यातनाम कवी, निवेदक अजिम नवाज राही यांनी मांडले.माजलगाव येथील स्वा.सै.शाहीर ना.मा.मिरगे प्रतिष्ठाण चा 6 वा राज्यस्तरीय पुरस्कार स्विकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. म.फुले विद्यालयाच्या अनंत भालेराव सभाग्रहात व्यासपीठावर नवविकासमंडळाचे अध्यक्ष अँड.एस आर. शर्मा ,प्रसिद्ध कवी प्रभाकर साळेगावकर , म.फुले विद्यालय शालेय समिती चे अध्यक्ष र.ब.देशमुख , प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाट्यलेखक अरुण मिरगे , सचीव श्याम मिरगे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथे प्रमाणे प्रारंभी मारोती मिरगे , रोहीणी जोशी ,शाम मिरगे यांनी शाहीरांच्या कवितांचे वाचन केले. यावर्षीचा पुरस्कार अजिम नवाज राही यांच्या कल्लोळातला एकांत या काव्यसंग्रहासाठी राही यांना अँड.एस.आर.शर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कल्लोळातील एकांत या काव्यसंग्रहा वर बोलताना कवी प्रभाकर साळेगावकर म्हणाले, की जगणं आणि भोगणं यापेक्षा राही यांची कवितेला वागणं महत्वाचं वाटतं , हा महत्वाचा सा-या अनुबंधाचा पुल उन्नत करणारी कविता या संग्रहात आहे. जात ,धर्म ,प्रांत या पेक्षा माणुस मोठा करणा-या कवितेत येणारी प्रतिमा आणि प्रतिके विलक्षण वेगळी आहेत. परंपरा ,आधुनिकता यांचा वस्तुनिष्ठ दर्शनाचा पाढा विषद करणा-या १३४ कवितेला कोणत्याही अभिनवेशासाचा लवलेश नाही. माणुस किती शिकला याला महत्व नाही तो कसा वागला हे महत्वाचे आहे.पर्यावरण निष्ठ, एकात्मता निष्ठ , मानवता निष्ठ , कवितेचा मुक्तछंद टोकदार लयीने मांडणारे राही हे नव्वोदत्तरी कवितेचे महत्वाचे कवी आहेत. अजिम नवाज राही यांच्या ही तासाभराच्या ओघवत्या शैलीने रसिक मोहरून गेले. पडझड मोहल्लाची, सडकेलगतची झाडे, अमेरिका या कविता सादर झाल्या. राज्यस्तरीय अशा पुरस्काराच्या शानदार वितरण सोहळ्यास साहित्यिक मोहीब कादरी, अशोक वाडेकर, भास्कर काळे, लता जोश, दैठणकर, खेलबा काळे, भारत सोळंके, प्रकाश पत्की, डाँ.प्रज्ञा जोशी, प्रशांत भानप ,अंजीराम भोसले ,आरेफ शेख ,सूरेखा कोकड ,प्रतिभा थिगळे ,बळीराम वायबसे यांच्यासह अनेक रसिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवी अशोक मिरगे यांनी केले तर मानपत्राचे वाचन आणि आभार प्रदर्शन कवी महेश देशमुख यांनी केले.