बुलडाणा : अमरावती विभागास २0१३-१४ या आर्थिक वर्षासाठी दिलेल्या करमणूक शुल्क वसुलीच्या उद्दिष्टापेक्षा जास्त कर वसुली करण्यात आली आहे. या विभागास करमणूक कराचे १४.५६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात मार्च अखेरपर्यंत १५.१७ कोटी रुपयांचा कर वसूल करण्यात आला. अमरावती विभागात अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलडाणा या पाच जिल्ह्यांना २0१३-१४ या वित्तीय वर्षासाठी १४ कोटी ५६ लाख रुपयांचा करमणूक कर वसूल करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. या उद्दिष्टपेक्षा जास्त, म्हणजे १0४ टक्के कर वसुली करण्यात आली आहे. अकोला, यवतमाळ आणि बुलडाणा या तिन जिल्ह्यात करमणूक कर वसुलीत गत वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. बुलडाणा जिल्ह्याला २.२५ कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. प्रत्यक्षात या जिल्ह्याने ३.0७ कोटी रुपयांची वसुली केली. यवतमाळ जिल्ह्याने २.५१ कोटी रुपयांचे उद्दिष्ट पार करून, १0६.२३ टक्के म्हणजेच २.६६ कोटी रुपये प्राप्त केले. अकोला जिल्ह्याला ३.९१ कोटींचे लक्ष्य देण्यात आले होते. या जिल्ह्याने १0४.३२ टक्के वसुली करीत, ४.0७ कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केले. अमरावती जिल्ह्याने ६.२५ कोटी आणि वाशिम जिल्ह्याने १.९५ कोटी रुपयांचे करमणूक कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
उद्दिष्टापेक्षा जास्त करमणूक कर वसुली!
By admin | Published: September 08, 2014 1:46 AM