लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: महावितरण व शासनाच्या निष्काळजीपणामुळे आठ महिन्यापूर्वी जाहिरात काढलेल्या विद्यूत सहाय्यक व उपकेंद्र सहाय्यकांची भरती होवू शकली नसल्याने महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकामध्ये संतापाची लाट पसरली आहे.महाराष्ट्र शासनाने १३ जुलैरोजी महावितरण कंपनीमध्ये विद्युत सहाय्यक ५ हजार व उपकेंद्र सहाय्यक पदाकरिता २ हजार अशा एकूण ७ हजार पात्र उमेदवारांच्या अर्ज बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रातील लाखो आयटीआय धारकांनी आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरले व सदरची भरती ही जाहिरात निघाल्यापासून ४५ दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे उर्जा मंत्र्यांचे आदेश होते.या सर्व प्रक्रियेला तब्बल सात ते आठ महिने होऊन देखील भरती प्रक्रिया शासनाच्या व महावितरणच्या निष्काळजी व दिरंगाईमुळे आज पर्यंत पूर्ण केलेली नाही. भरती प्रक्रिया रखडल्यामुळे अर्जदारांमध्ये संतापाची लाट असून लाखो विद्यार्थ्यावर बेरोजगारीची वेळ आली आहे. आयटीआयधारकांच्या हाताला काम नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे, विलंबामुळे अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा निघून जात आहे. भरती प्रक्रिया राबविली जात नसल्याने मुंबईत महावितरणच्या ‘प्रकाशगड’ कार्यालयासमोर ४ मार्चपासून ठिय्या देणार आहेत.त्यामुळे ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करून भरतीला प्राधान्य द्यावे. सोबतच बेरोजगारांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.
आठ महिन्यापासून विद्यूत सहायक पदाची भरती प्रक्रिया रखडली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 3:00 PM