- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: बहुप्रतीक्षेनंतर निवडणुकांच्या तोंडावर ‘झेडपी’तील पदभरतीचा मुहूर्त निघाल आहे. राज्यात जिल्हा परिषदांमध्ये विविध संवर्गातील १३ हजार ५७० पदे भरण्यात येत आहेत. आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी २६ मार्चपासून सुरूवात झाली असून सुशिक्षीत बेरोजगारांचे लक्ष आता पदभरतीकडे लागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ‘मेगा भरती’साठी प्रशासकीय पातळीवरुन हालचाली सुरू होत्या. त्यात विविध पदांसाठी भरती मध्यंतरी घेण्यात आली. परंतू त्यासाठी ठरावीक शैक्षणिक पात्रतेचे उमेदवारच पात्र ठरत होते. त्यामुळे सुशिक्षीत बेरोजगारांनाही जिल्हा परिषदमधून निघणाºया विविध आस्थापनेवरील पदभरतीची प्रतीक्षा लागली होती. लोकसभा निवडणूकीची आदर्श आचार संहिता लागल्यापासून युवकांनीही पदभरतीच्या प्रक्रियेची आशा सोडून दिली होती. परंतू राज्यातील जिल्हा परिषदमध्ये रिक्त असलेल्या पदांसाठी मोठी भरती काढली आहे. ही सर्व प्रक्रिया आॅनलाईन होत असून त्यासाठी विविध विभागांतील रिक्त जागांची माहिती घेणे, आरक्षणांनुसार पदांची निश्चिती करून त्याचा अहवाल तयार करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडून पूर्ण झाल्यानंतर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी २६ मार्चपासून आॅनलाइन अर्ज भरण्याला सुरूवात झाली असून १६ एप्रिल ही अर्ज भरण्याची अंतीम मुदत आहे. राज्य शासनाच्या नियंत्रणात जिल्हा परिषदांची आॅनलाइन भरती प्रक्रिया प्रथमच होत आहे. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कंत्राटी ग्रामसेवक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, विस्तार अधिकारी (कृषी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), वरिष्ठ सहाय्यक (लिपिक), पर्यवेक्षिका (अंगणवाडी), कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ यांत्रिकी या पदांसाठी ही भरती घेण्यात येत आहे. जिल्हा परिषद निहाय जागाअहमदनगर ७२९, अकोला २४२, अमरावती ४६३, औरंगाबाद ३६२, बीड ४५६, भंडारा १४३, बुलडाणा ३३२, चंद्रपूर ३२३, धुळे २१९, गडचिरोली ३३५, गोंदिया २५७, हिंगोली १५०, जालना ३२८, जळगाव ६०७, कोल्हापूर ५५२, लातूर २८६, उस्मानाबाद ३२०, मुंबई (उपनगर) ३५, नागपूर ४०५, नांदेड ५५७, नंदुरबार ३३२, नाशिक ६८७, पालघर ७०८, परभणी २५९, पुणे ५९५, रायगड ५१०, रत्नागिरी ४६६, सातारा ७०८, सांगली ४७१, सिंधुदुर्ग १७१, सोलापूर ४१५, ठाणे १९६, वर्धा २६४, वाशिम १८२ आणि यवतमाळ ५०५ जागा आहेत.
जिल्हा परिषद अंतर्गत सर्व विभागनिहाय रिक्त पदांची माहिती घेतल्यानंतर ही पदभरती सुरू करण्यात आली आहे. पदभरतीची सर्व प्रक्रिया आॅनलाइन होत असून २६ मार्च ते १६ एप्रिल हा कालावधी उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी देण्यात आला आहे. - राजेश लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. बुलडाणा.