लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/ अंढेरा : खरीप हंगामासाठी पिक विमा काढण्याकरिता शेतकर्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. विमा काढण्याकरिता शेतकर्यांना यावर्षीपासून सातबारा, आठ अ सह विविध विविध कागदपत्रांची गरज असून, सदर कागदपत्रे मिळविण्यातच शेतकर्यांची दमछाक होत आहे. त्यातच बँकेचे अधिकारी विमा स्वीकारण्यास नकार देत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. प्रधानमंत्री पिकविमा योजनेत खरीप हंगाम २0१७ मध्ये पिकविमा भरण्याची अंतीम तारीख ३१ जुलै होती. यावर्षी प्रथमच पिक विमा भरण्याच्या पध्दतीत काही सुधारणा करण्यात आल्या आहेत. पिकपेरा प्रमाणपत्रासोबतच यंदा विमा भरण्यासाठी ऑनलाईन ७/१२, ८अ, आधारकार्ड, बॅक पासबुक, बँक खाते संलग्नीत करणे बंधनकारक करण्यात आले आहे.अंढेरासह, सेवानगर, पिंप्रीआंधळे, मेंडगाव, बायगांव बु., गुजाळा, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे, पाडळी शिंदे येथील शेतकरी पिक विमा भरण्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करताना शेतकर्यांच्या नाकीनऊ येत आहे. ऑनलाईन ७/१२ मिळविण्यासाठी चक्क १- १ दिवस लागत आहे. परिसरात गेल्या १५-२0 दिवसापासून पावसाने दडी मारल्याने पिके पावसाअभावी सुकू लागली आहेत. ऐन पिके वाढण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने हतबल झालेले परिसरातील शेतकर्यांचा पिक विमा भरण्याकडे कल वाढला आहे. यासर्व कारणामुळे शेतकर्यांची अवस्था ‘रात्र थोडी अन् सोंगे फार’ अशी झाली आहे. ३१ जुलै २0१७ पर्यंत सर्वत्र शेतकर्यांना पिक विमा भरता आला नाही शासनाने ही गोष्ट लक्षात घेवून सुधारीत वाढीव तारीख ५ ऑगस्ट पर्यंत वाढविली. ३ ऑगस्ट रोजी स्थानिक अंढेरा येथील व विदर्भ कोकण ग्रामीण बँकमध्ये पिक विमा होत नसल्याचे लक्षात येताच प्रा.दिलीपराव सानप, संतोष काकड, संतोष नागरे, राधाकिसन ढाकणे, हनिफ शेख यांनी बँकेच्या अधिकार्यांशी चर्चा केली असता पहिल्या आदेशानुसार ५ ऑगस्टपर्यंंत पिक विमा बँकेत स्विकारल्या जाईल असे सांगितले. परंतु दुसर्या आदेशात वाढलेली मुदत ४ ऑगस्टपर्यंत असल्याचे सांगत केवळ बिगर कर्जदार शेतकरी ‘सीएससी केंद्रावरच ऑनलाईन पध्दतीने भरण्यात येईल असे सांगितले. ऑनलाईन पिक विमा भरण्याला फक्त एकच दिवस शिल्लक राहीले असून परिसरातील शेतकरी सीएससी केंद्राचा शोध घेवू लागले आहेत. परंतु संबंधी केंद्राचा ताळमेळ बसत नसल्याने व ऑनलाईन लिंक मिळत नसल्याने शेतकरी परत पिक विमा भरण्यापासून वंचीत राहतात का? तसेच शेतकर्यांची ससेहोलपट सुरु आहे.
बिगर कर्जदार शेतकर्यांना पिक विमा भरण्याचा शेवटचा दिवसखरीप हंगामासाठी जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकर्यांना यापूर्वी ३१ जुलै अंतिम मुदत होती. यामध्ये शासनाने मुदतवाढ दिली असून बिगर कर्जदार शेतकर्यांना ४ ऑगस्टपयर्ंत पिक विमा जनसुविधा केंद्रामार्फत भरता येणार आहे. विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ४ ऑगस्ट हा शेवटचा दिवस आहे. मुदतवाढ देण्यात आलेल्या कालावधीत पिक विमा आता केवळ बिगर कर्जदार शेतकर्यांना ऑनलाईन भरल्या जाणार आहे. ही मुदतवाढ केवळ बिगर कर्जदार शेतकर्यांसाठीच असून अर्जदार शेतकर्यांकडे ३१ जुलै पूवीर्चे पीक पेरणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. सीएससी केंद्रांनी मुदतवाढीच्या कालावधीत दाखल करण्यात आलेल्या अजार्बाबतची माहिती स्वतंत्रपणे ठेवण्यात येणार आहे. तरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभाग घेण्याची वाढीव मुदत जिल्ह्यातील सर्व अधिसुचित पिकांकरीता ४ ऑगस्ट अशी आहे. या अंतिम दिनांकापूर्वी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. त्याकरिता तात्काळ नजीकच्या जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, उपविभागी कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. शेतकर्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता जास्तीत जास्त प्रमाणात पंतप्रधान पिक विमा योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे यांनी केले आहे.