साखरखेर्डा (जि. बुलढाणा): गुंतागुंतीच्या साखरखेर्डा कॉपी प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या विशेष पथकाने या संपूर्ण प्रकरणाची उकल करण्यासाठी परीक्षा केंद्रावरील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या जबाबाची नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून ही साखळी नेमकी कशी तयार झाली याची उकल करण्यास मदत मिळणार आहे.
दुसरीकडे या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली असून सातही आरेपी सध्या पोलिस कोठडीत आहेत. तीन मार्च ारेजी १२ वीच्या गणिताचा पेपर मोबाईल ग्रुपवर व्हायरल झाला होता. या प्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली होती. १० मार्च पर्यंत त्यांना पोलिस कोठडी न्यायालायने सुनावली आहे. दरम्यान पेपर फुटी प्रकरणी सर्वप्रथम शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे संचालक गोपाल दामोदर शिंगणे यांना अटक झाली होती. त्यांच्या मोबाईलमधून ‘खुपीया’ गृपवर त्यांनी प्रश्नपत्रीका व्हायरल केली होती, असा आरोप आहे.
त्यानंतर गणेश शिवानंद नागरे, पवन सुधाकर नागरे, गणेश बंद्रीनाथ पालवे, यशवंतराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय किनगावजट्टू येथील गजानन शेषराव आडे यांना अटक झाली होती. यातील गजानन आडे यांची विनाअनुदानित शाळा व काॅलेज असून यांना डॉ . झाकीर हुसेन विद्यालयाचे शिक्षक शेख अकील शेख मुनाफ यांनी सकाळी १० :२० वाजता परीक्षा सुरु होण्यापूर्वी प्रश्न प्रश्न पत्रीका व्हायरल केली होती . अंकुश पृथ्वीराज चव्हाण या शिक्षकाने विद्यार्थ्यांना परीक्षा काळात उत्तरे पुरविल्याची चर्चा आहे. त्याच बरोबर शेंदुर्जन येथील वच्छगुलाब बहुउद्देशीय संस्थेचे विद्यार्थी राजेगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देत असल्या कारणाने काही विद्यार्थ्यांना सामुहिक काॅपी पुरविल्या गेल्याची माहिती आहे.
त्यामुळे पोलीसांनी राजेगाव, बिबी, लोणार येथील परीक्षा केंद्रावर उपस्थित शिक्षकांचे जबाब व साक्षी पुरावे घेण्यास सुरुवात केली आहे. परीक्षा सुरु असतांना पेपर बाहेर कसा आला? त्याचा लाभ कोणी कोणी कसा घेतला?, याबाबत पोलीस तपास करीत आहे. बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार, ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी शेंदुर्जन येथील काही शिक्षकांना बोलावून त्यांची साक्ष नोंदणी सुरू केली होती. टप्प्या टप्प्याने याची व्याप्ती वाढवून प्रकरणाच्या मुख्य सुत्रधारापर्यंत पोहोचण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.