व्हायरल आजारांमध्ये वाढ !
बुलडाणा : जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण व सकाळच्या वेळेस थंड हवा सुटत आहे. कोरोनाचे रूग्ण वाढत असतानाच हवामान बदलामुळे थंडी, ताप, घसा, खोकला, अंगदुखी आदी व्हायरल आजार वाढले आहेत. त्यात सर्दी, खोकल्याचे रुग्ण अधिक असल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य उपकेंद्रात रिक्त जागा
मोताळा : तालुक्यात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व कंत्राटी आरोग्य सेविका यांच्या रिक्त जागा आहेत. सध्या आजार वाढले आहेत. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या पाहता आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे.
विद्यार्थी करतात पालकांना मदत
सुलतानपूर : सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी आपल्या पालकांना शेतात काडीकचरा वेचणीच्या कामात मदत करीत आहेत. सध्या मजूर मिळत नसल्याने पालकांना आधार हाेत असल्याचे चित्र आहे.
महिला शासकीय योजनांपासून वंचित
मेहकर : शासनाच्या आरोग्य विभागाकडून सुरु करण्यात आलेल्या जननी शिशु सुरक्षा योजनेचा तालुक्यात बोजवारा उडाला आहे. अनेक महिला शासनाच्या या योजनेपासून अनभिज्ञ आहेत. गरोदर महिला शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत.
नेटवर्क नसल्याने ग्राहक त्रस्त
हिवरा आश्रम : गत काही दिवसांपासून काेणत्याच माेबाइल कंपन्यांची रेंज राहत नसल्याने ग्राहक त्रस्त आहेत. इंटरनेटही चालत नाही आणि काॅलही लागत नसल्याने महागडे रिचार्ज करणारे ग्राहक अडचणीत आहेत.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला
लोणार : गत काही दिवसांपासून परिसरात प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढला आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी हाेत आहे. शासनाने प्लास्टिक बंदीचे आदेश दिले असले तरी त्याची अंमलबजावणी हाेत नसल्याचे चित्र आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी हाेत आहे.
विद्युत पुरवठा गूल
बुलडाणा: सध्या महावितरणची मान्सूनपूर्व कामे सुरू आहेत. अनेक ठिकाणी विद्युत तारांसाठी अडथळा ठरणाऱ्या झाडांची छाटणी करण्यात येत आहे. गुरूवारी सकाळपासून बुलडाणा शहरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता.