मासरुळ : ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवरील निवासी प्रयोजनासाठीचे अतिक्रमण नियमानुकूल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल बुलडाणाचे जिल्हाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा उपाध्यक्ष मनाेज दांडगे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
जिल्ह्यामध्ये शासकीय जागेवर अतिक्रमण करून वास्तव करणाऱ्या कुटुंबांची संख्या खूप मोठी आहे. या कुटुंबांपैकी अनेकांची नावे रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, अदिम आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आदी योजनेअंतर्गत घरकुलाच्या यादीमध्ये आली आहेत; परंतु जागेअभावी घरकुले मिळू शकली नाहीत .एकट्या बुलडाणा तालुक्यात तीन हजारपेक्षा जास्त प्रस्ताव आहेत. एकट्या जामठी या एका गावात ६० पेक्षा जास्त प्रस्ताव नियमानुकूल करण्याच्या प्रतीक्षेत गेल्या कित्येक दिवसांपासून आहेत. यावरून प्रशासनाची गोरगरीब कुटुंबांप्रती अनास्था दिसून येत आहे. तरी संपूर्ण जिल्ह्यामध्ये व विशेषतः बुलडाणा तालुक्यामध्ये निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्यात यावी, अशी मागणी दांडगे यांनी केली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदाेलन करण्याचा इशारा मनाेज दांडगे यांनी निवेदनात दिला आहे. यावेळी महेश देवरे, शरद ताठे, गणेश शिंदे, राष्ट्रवादीचे नेते रमेश तायडे, आदी उपस्थित हाेते.